मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठा यंदा ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचला असला तरी मुंबईची दैनंदिन पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत असून हा पाणीसाठा आता मुंबईला पुरेनासा झाला आहे. कितीही काटकसर केली तरी पुढील वर्षी मे महिन्यात पाणी कपात करावी लागेल किंवा राखीव साठ्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. मुंबईला सध्या दरदिवशी ४५०० ते ४६०० दशलक्ष लीटर पाण्याची गरज असून सध्या केवळ ४००० दशलक्ष लीटर पाणी पुरवठा करणे मुंबई महापालिकेला शक्य आहे.
यंदा मुंबई आणि आसपासच्या शहरात विशेषत: धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांत ९८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. धरणे काठोकाठ भरल्यामुळे पालिका प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडलेला असला तरी हा पाणीपुरवठा आता पुरेनासा झाला आहे हे आकडेवारीवरून सिद्ध झाले आहे.
मुंबईच्या दैनंदिन पाणीपुरवठ्यामध्ये दरवर्षी वाढ करावी लागत आहे. त्यामुळे हा पाणीपुरवठा आता पुरेनासा झाला आहे. मुंबईला काही वर्षांपूर्वी ३८५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जात होता. सध्या दैनंदिन ४००० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र सण, उत्सवाच्या काळात पाण्याची मागणी वाढते. अशावेळी ४१०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो.
मुंबईत मोठ्या प्रमाणावर इमारतींचे बांधकाम सुरू असून लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबईची सध्याची दैनंदिन पाण्याची गरज ४५०० ते ४६०० दशलक्ष लीटरवर पोहोचली आहे. मात्र इतके पाणी दिले तर धरणातील पाणी वर्षभर पुरणार नाही. मार्च महिन्यातच धरणे तळ गाठतील, अशी भीती जल अभियंता विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
दरवर्षी पावसाचे चार महिने संपले की ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीला पाणीसाठ्याचा अंदाज घेतला जातो. धरणे काठोकाठ भरली असली की पाणी कपात करावी लागत नाही. मात्र गेल्या काही वर्षांपासून मे महिना जवळ आला की पाणी कपात करावी लागते किंवा राखीव साठ्याला हात घालावा लागतो. पाणीपुरवठ्याची स्थिती वर्षानुवर्षे बिकट होत चालल्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली
ठाणे महापालिका हद्दीलाही पाणीपुरवठा
मुंबई पाणीपुरवठा करणारी धरणे मुंबईबाहेर असून धरणातून मुंबईत पाणी आणण्यासाठी टाकलेल्या जलवाहिन्या ठाणे जिल्ह्यातून येतात. त्याच्या बदल्यात १९९० सालापासून ठाणे जिल्ह्याला मुंबई महापालिका ९० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा करीत आहे. या पाणीपुरवठ्यातही गेल्या काही वर्षांत वाढ झाली आहे. गेल्या दोन – तीन वर्षांत या पाणीपुरवठ्यातही सुमारे २५ दशलक्ष लीटरने वाढ झाली आहे. सध्या मुंबई महापालिकेतर्फे १२० दशलक्ष लीटर पाणी दरदिवशी ठाणे महापालिकेला दिले जाते. तसेच भिवंडी शहराला ४५ दशलक्ष लीटर पाणी दिले जाते. तर जलवाहिन्या ज्या खेड्यांमधून येतात त्या खेड्यांना सुमारे २० दशलक्ष लीटर पाणी दिले जाते.
मागणी वाढली मात्र जलस्रोत जैसे थे
दिवसेंदिवस मुंबईची लोकसंख्या वाढत असून पाण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी मुंबई महापालिकेने गारगाई, पिंजाळ व दमणगंगा असे तीन प्रकल्प हाती घेतले होते. या सर्व प्रकल्पांचे काम रखडले आहे. मध्य वैतरणा धरण २०१४ मध्ये बांधून पूर्ण झाल्यानंतर गेल्या १० वर्षात एकही नवीन धरण मुंबई महापालिकेने बांधलेले नाही. त्यातच समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पही रखडला आहे. धरणातील पाणीसाठा पन्नास टक्क्यावर आल्यानंतर राखीव साठ्याची मागणी करणारे पत्र महापालिका प्रशासनाकडून राज्य सरकारला पाठण्यात येते. साधारणतः मे महिन्यात अशी वेळ येते. यंदा मात्र ही वेळ मार्च महिन्यातच आली आहे.
येत्या काळात मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येसाठी पाण्याची मागणीही वाढणार आहे. मुंबईकरांची २०४१ पर्यंत दैनंदिन पाण्याची गरज ५९४० दशलक्ष लीटर इतकी होणार आहे.
सध्याची पाण्याची दरदिवशीची मागणी
अंधेरी पूर्व आणि पश्चिम – ४८० दशलक्ष लीटर
कर्ला – २४० ते २७० दशलक्ष लीटर
चर्चगेट, गिरगाव, ग्रॅंटरोड, मलबार हिल – २५० दशलक्ष लीटर
वरळी, प्रभादेवी, दादर, माहीम – १५० ते १६० दशलक्ष लीटर