मुंबई : लोकलमधील गर्दीचा फायदा घेत अनेक प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. परंतु, कर्तव्यावरील तिकीट तपासनीस विनातिकीट प्रवाशांना हेरून, त्यांच्याकडून दंडवसुली करीत आहेत. पश्चिम रेल्वेने एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या कालावधी विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करून ९७ कोटी रुपये दंड वसूल केला आहे. तर, वातानुकूलित लोकलमधील विनातिकीट प्रवाशांना पकडून १.५९ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वेवरील नियमितपणे मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर, विशेष रेल्वेगाड्या, लोकलमध्ये व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांवर अकुंश लावण्यात येत आहे. अनधिकृत प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमितपणे विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात येत आहेत. यामध्ये स्थानक तपासणी, अचानक धाड तपासणी (ॲम्बुश तपासणी), तटबंदी तपासणी (फोर्ट्रेस चेक), व्यापक तपासणी आणि मेगा तिकीट तपासणी मोहिमांचा समावेश आहे.

एप्रिल – सप्टेंबर २०२५ या कालावधीत अनेक तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. त्यामुळे ९७ कोटी रुपये दंड वसूल करण्यात यश आले. गेल्या वर्षी याच कालावधीत ४२ टक्क्यांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला होता. तसेच रेल्वे मंडळाने निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा चांगली कामगिरी करण्यात आली आहे. तर, मुंबई उपनगरीय विभागातून २७ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली.

पश्चिम रेल्वेने सप्टेंबर २०२५ मध्ये वसूल केलेल्या दंडाच्या रकमेत लक्षणीय वाढ झाली. तिकीट नसलेल्या / अनियमित २.३५ लाख प्रवाशांना शोधून १३.२८ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. यामध्ये आरक्षित न केलेल्या सामानाच्या प्रकरणांचाही समावेश आहे. मागील वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत त्यात ११६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये मुंबई उपनगरीय विभागातील सुमारे ९६ हजार प्रकरणी वसूल केलेल्या ४ कोटी रुपये दंडाचा समावेश आहे. वातानुकूलित लोकलमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी वारंवार अचानक तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या जात आहेत. वातानुकूलित लोकलमध्ये लक्ष केंद्रित केलेल्या मोहिमेमुळे एप्रिल – सप्टेंबर २०२५ या कालावधीत ४९ हजारांहून अधिक अनधिकृत प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून या प्रवाशांकडून १.५९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. गेल्या वर्षातील याच कालावधीच्या तुलनेत तो ७० टक्के जास्त आहे.

पश्चिम रेल्वेवरून दररोज १,४०६ लोकल फेऱ्या धावतात. या लोकल फेऱ्यांमधून सुमारे ३० लाख प्रवासी प्रवास करतात. तसेच पश्चिम रेल्वेवर सध्या १०९ वातानुकूलित लोकल फेऱ्या धावतात. यामधून दररोज सुमारे १.२६ लाख प्रवासी प्रवास करतात. परंतु, विनातिकीट प्रवाशांमुळे तिकीटधारक प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होतो. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांवर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली.