मुंबई : पश्चिम रेल्वेवरील काही स्थानकांवर अत्याधुनिक इंडिकेटर बसवण्यात आले असून प्रवाशांना दुरूनच इंडिकेटरवरील माहिती दिसून शकेल. त्यामुळे प्रवाशांना लोकलचे वेळापत्रक सुस्पष्टपणे दिसणार आहे.
पश्चिम रेल्वेने मुंबई उपनगरीय स्थानकांवरील सुविधा वाढवण्यासाठी आणि पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. तसेच भारतीय रेल्वेवर अमृत भारत स्थानक योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा एक भाग म्हणून रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक इंडिकेटर बसवण्याचे काम सुरू आहे. पश्चिम रेल्वेवरील मरिन लाईन्स, चर्नी रोड, ग्रँट रोड, लोअर परळ, प्रभादेवी, जोगेश्वरी आणि मालाड स्थानकांवर अत्याधुनिक इंडिकेटर बसविण्यात आले आहेत.
अमृत भारत स्थानक योजनेतंर्गत ‘या’ सुविधा प्रदान
अमृत भारत स्थानक योजनेतंर्गत १,३०० हून अधिक स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. आतापर्यंत १०३ स्थानकांमध्ये भव्य प्रवेशद्वार, आकर्षक दर्शनी भाग, उच्च दर्जाची प्रकाशयोजना, आधुनिक प्रतीक्षालये, तिकीट खिडक्या, अत्याधुनिक शौचालये आणि दिव्यांगजनांसाठी सुलभ रॅम्प आदी सुविधा करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, फलाटावर निवारा, कोच इंडिकेशन सिस्टम आणि डिजिटल डिस्प्ले बसवण्यात आले आहेत.