मुंबई : पश्चिम रेल्वेवरील सरकते जिने, उद््वाहक बंद पडल्यावर त्याची माहिती प्रशासनाला बऱ्याच वेळानंतर मिळते. त्यानंतर, ही सेवा पूर्ववत करण्यास विलंब लागतो. परिणामी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे पश्चिम रेल्वेने ”सुगम रेल” ॲप कार्यान्वित केले. याद्वारे सरकते जिने, उद््वाहक आणि अर्थिंग पिट्स नियंत्रित केल्या जातील. बिघाड झालेले उद््वाहक, सरकत्या जिन्याची माहिती त्वरित विभागाला कळवून, वेळेत दुरुस्तीची कामे केली जातील. त्यामुळे या सेवाचा प्रवाशांना लाभ होणार आहे.

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली विकसित केलेले ‘सुगम रेल’ ४७० हून अधिक उद््वाहक, सरकते जिने आणि अंदाजे २१ हजार ५०० अर्थिंग पिट्सचे निरीक्षण व देखभाल करणार आहे. ही अत्याधुनिक प्रणाली सर्व माहिती एका एकात्मिक डिजिटल डॅशबोर्डमध्ये एकत्रित करते. जी विभागीय आणि मुख्यालय पातळीवरील अधिकाऱ्यांना उपलब्ध असेल.

डिजिटल प्रशासन आणि वाढीव प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दिशेने भारतीय रेल्वेच्या प्रवासात हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या प्रणालीमुळे सरकते जिने, उद््वाहक यामधील दोष तत्काळ शोधून ते दुरुस्त करणे सोयीस्कर होणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली.

– ”सुगम रेल” हे सरकते जिने आणि उद््वाहकाचे निरीक्षक, देखभाल व बिघाड विश्लेषणासाठी तयार केलेली एक सर्वसमावेशक मालमत्ता व्यवस्थापन प्रणाली आहे. या प्रणालीद्वारे देखभाल वेळापत्रक आणि तपासणी अहवालांचे डिजिटायझेशन केले गेले आहे.

– ही प्रणाली वारंवार होणाऱ्या बिघाडांबाबत आणि देखभालीची नियोजित मुदत चुकल्यास त्वरित सतर्क करते. त्यामुळे वेळेत देखभाल-दुरुस्ती केली जाते.

– ही प्रणाली सरकते जिने, उद््वाहक यांच्या बिघाडाच्या कारणानुसार सविस्तर विश्लेषण करते.

– सरकते जिने आणि उद््वाहकाची सुरळीत आणि निरंतर सेवा सुरू राहण्याचे काम ‘सुगम रेल’ करते. प्रवाशांना विशेषतः ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, गर्भवती महिला आणि अपंगांसाठी ही सेवा लाभदायक आहे.

– ‘सुगम रेल’द्वारे नियमित देखरेखीमुळे संभाव्य बिघाड ओळखता येतो. त्यामुळे बिघाड होण्याची शक्यता कमी होते आणि वेळेवर देखभाल होते.

– बिघाड झाल्यास, ‘सुगम रेल’ सरकते जिने, उद््वाहकातील समस्येचे जलद निवारण करते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय कमी होते.