मुंबई : दिवाळी, छठपूजेनिमित्ताने नियमित रेल्वेगाड्यांसह, विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येत आहेत. त्यामुळे रेल्वे मार्गावरील वाहतूक वाढली असून प्रचंड ताण येत आहे. परंतु, याबाबत नियोजनबद्ध कार्यवाही करत, पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाने २२ ऑक्टोबर रोजी १०० टक्के वक्तशीरपणा गाठला.

पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात ६०० किमीहून अधिक लांबीचा रेल्वे मार्ग असून या मार्गावरून दररोज सुमारे १५० रेल्वेगाड्या आणि मुंबई उपनगरीय रेल्वे भागात १,४०० पेक्षा जास्त लोकल धावतात. त्यामुळे देशातील सर्वाधिक गुंतागुंतीच्या मार्गापैकी पश्चिम रेल्वे एक आहे. सध्या दिवाळी आणि छठ पुजेनिमित्त विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येत आहेत.

मात्र, या सर्व आव्हानात्मक बाबी योग्यरित्या हाताळल्याने रेल्वे सेवा सुरळीत आहे. परिणाम, मुंबई सेंट्रल विभागाला १०० टक्के वक्तशीरपणा गाठणे शक्य झाले. तसेच पश्चिम रेल्वे प्रशासना सर्व प्रवाशांना सुरक्षित, कार्यक्षम आणि विश्वासार्ह सेवा देत आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.

दिवाळी – छठ पुजेनिमित्ताने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे १२,०११ विशेष रेल्वेगाड्या चालवत आहे. या रेल्वेगाड्या बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, दिल्ली आणि मध्य प्रदेश या राज्यात जात आहेत. प्रवाशांचा प्रवास चांगला व्हावा यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच विनातिकीट प्रवाशांमुळे रेल्वेगाडीत गर्दी होते. ही गर्दी रोखण्यासाठी विनातिकीट प्रवाशांना तिकीट तपासनीस पथकाद्वारे पकडण्यात येत आहे.