मुंबई : पश्चिम रेल्वेच्या ‘शून्य भंगार मोहिम’चा एक भाग म्हणून मुंबई सेंट्रल, वडोदरा, रतलाम, राजकोट, भावनगर आणि अहमदाबाद या विभागांतील भंगाराची विक्री करण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गंत प्रत्येक विभाग, कारखाना आणि कारशेडमधील भंगाराचे साहित्य गोळा करण्यात येत आहे. भंगार विक्रीतून २०२५-२६ या आर्थिक वर्षात आतापर्यंत पश्चिम रेल्वेला ३०२ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे.

भंगार विक्रीची कामगिरी रेल्वे मंडळाच्या निश्चित केलेल्या प्रमाणित लक्ष्यापेक्षा अंदाजे २१ टक्के जास्त आहे. गेल्या वर्षी १३ नोव्हेंबर रोजी ही महत्त्वपूर्ण कामगिरी साध्य झाली होती. त्यावेळी पश्चिम रेल्वेला भंगार विक्रीतून ३०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम मिळाली होती, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

रेल्वे परिसर, आगार, कारखान्यातील लोह, स्टील, अॅल्युमिनियम, पितळ, तांबे व इतर धातूच्या भंगाराची विक्री केली. तसेच रेल्वे रुळाचे भाग, पडीत खांब असे वजनदार साहित्य असते. या धातूच्या वस्तू व इतर भंगाराच्या साहित्याला मोठी मागणी असते. त्यामुळे हे साहित्य विकून कोट्यवधी रुपयांची कमाई झाली आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली.