कोर्टाच्या आदेशांनंतर मुंबईतील कबुतरखाने बंद झाले आहेत. हे कबुतरखाने पुन्हा सुरु व्हावेत अशी मागणी जैन आणि इतर काही इतर धर्मीयही करत आहेत. याच औचित्याने दादरच्या योगी सभागृहात ‘कबूतर बचाओ धर्मसभा’ आयोजित करण्यात आली, या धर्मसभेच्या निमित्ताने जैन, हिंदू,बौद्ध धर्मगुरु एकाच मंचावर आले. या धर्म सभेत कैवल्यरत्न महाराज यांनी एक वक्तव्य केलं. त्यावरुन मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
एखादा दुसरा व्यक्ती मेल्याने काय होतं?
‘एखाद दुसरा व्यक्ती मेल्याने काय होतं?’ असं कैवल्य रत्न महाराज यांनी म्हटलं आहे. त्यांच्या वक्तव्यावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘मी डॉक्टरांना मूर्ख मानतो’ असं देखील महाराज म्हणाले. “कबूतर हा बहाणा आहे. कबुतराला एक शस्त्र बनवण्यात आलं. या कुणालाही कबुतरांशी काही देणंघेणं नाही. कबुतरांच्या विष्ठेतून जो रोग पसरतो त्याच्याशी देणंघेणं नाही. एखादा माणूस मेला त्याच्याशी काही देणं घेणं नाही” अशी वक्तव्यं कैवल्य रत्न महाराज यांनी केली आहेत.
हजारो लोक मरत आहेत त्यांचं काय?
“हजारो, लाखो निष्पाप लोक मरतायत, त्या बद्दल कोणी विचार करत नाहीय. पाण्यासासाठी तडफडतायत त्या बद्दल कोणाकडे विचार करायला वेळ नाही. एखादा माणूस झाडाचं पान अंगावर पडून मेला हे मान्य कराल का? हा मूर्खपणा आहे. कबुतराच्या विष्ठेमुळे जीव जाईल का? असं बोलत असतील, तर मी डॉक्टरांना सुद्धा मूर्ख मानतो” असं वक्तव्य कैवल्य रत्न महाराजांनी केलं.
जैन मुनी निलेशचंद्र विजय काय म्हणाले?
जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दादरच्या धर्मसभेनंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. मुंबईतील जैन समाज सर्व समाजाच्या मदतीसाठी धावून जातो. आम्ही महाराष्ट्राच्या पूरग्रस्तांसाठी दोन कोटी रुपयांचा निधी देणगीस्वरुपात दिला. पण आमच्या मुद्द्यांसाठी कुणीही पुढे येताना दिसत नाही. यासाठी आम्हाला राजकीय पक्ष स्थापन करावा लागत आहे, असे निलेशचंद्र विजय म्हणाले. मुनी निलेशचंद्र विजय म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंनी जेव्हा शिवसेनेची स्थापना केली. तेव्हा त्यांच्या फलकावर वाघाचे चिन्ह होते. वाघ हे माता जगदंबेचे वाहन आहे. त्यामुळेच जगदंबेचा आशीर्वाद शिवसेनेला मिळाला. आताच्या शिवसेनेचे आम्हाला माहीत नाही. शांतीदूत असलेले कबुतर हे आमचे चिन्ह असेल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही उतरू. प्रत्येक वॉर्डात आमचे उमेदवार उभे राहतील.”