मुंबई : राज्यातील जंगलामध्ये वन्य पशूंच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचा परिणाम राज्यभरात दिसून येत आहे. त्यामुळे वनांच्या शेजारील, बफर झोन मधील जमिनी सरकार वार्षिक ५० हजार रुपये प्रति एकर दराने भाड्याने घेईल. भाड्याने घेतलेल्या जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्प, बांबू लागवड, सुंगधी गवतांची लागवड करेल, अशी माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी विधान परिषदेत दिली.
सदाभाऊ खोत, निरंजन डावखरे, शशिकांत शिंदे आदींनी वन्यपशूच्या हल्ल्यात होणारी मनुष्यहानी आणि शेतीच्या नुकसानीचा प्रश्न उपस्थित केला होता. सन २०२२ ते २०२५ या काळात वन्यप्राण्याच्या हल्ल्यात मनुष्यहानी आणि शेतीपिकांचे नुकसान होत आहे. संबंधितांना भरपाईही देण्यात येते. पण, हे सर्व उपाय अपुरे ठरत आहेत. वन्य प्राण्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे बफर झोन, वनाला लागून असलेल्या शेतीत पिके घेणे अशक्य होत आहे. वाघ, बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना दिवसोंदिवस वाढतच आहेत.
विदर्भात हा प्रश्न खूपच गंभीर आहे. त्यामुळे सरकारच्या वतीने जंगला लगतच्या, बफर झोनमधील जमिनी वार्षिक एकरी ५० हजार रुपयांनी भाड्याने घेऊन त्या ठिकाणी शक्य असल्यास सौरऊर्जा प्रकल्प उभारणे. सौरऊर्जा प्रकल्प उभारणी करणे शक्य नसल्यास तिथे बांबू लागवड करणे. वन्यप्राणी खात नाहीत, पण, सुगंधी द्रव्य निर्मितीसाठी वापरण्यात येणारे पामरोझा सारखे गवत लावण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सौरऊर्जा कंपन्या आणि सुंगधी द्रव्य निर्मिती करणाऱ्या कारखान्यांसोबत करार करण्यात येईल. असे झाल्यास शेतकऱ्यांना ठराविक रक्कम मिळेल. उदरनिर्वाहचा प्रश्न मिटेल, असेही नाईक म्हणाले.