Mumbai Train Blasts Acquittal: मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या मुंबई लोकलच्या पश्चिम मार्गावरील ट्रेनमध्ये ११ जुलै २००६ रोजी साखळी बॉम्बस्फोट घडविण्यात आले होते. या खटल्यात आता १७ वर्षांनंतर मकोका न्यायालयाने दोषी ठरवलेल्या सर्व १२ जणांना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत स्थापन केलेल्या विशेष न्यायालयाने २०१५ मध्ये पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या निकालाला उच्च न्यायालयाने सोमवारी (२१ जुलै) रद्द ठरवत १२ जणांची निर्दोष मुक्तता केली.

११ जुलै २००६ रोजी मुंबईच्या पश्चिम उपनगरीय रेल्वेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात १८९ प्रवासी ठार झाले तर ८२४ जण जखमी झाले होते. उच्च न्यायालयात सदर खटला सुरू असताना प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, घटनास्थळ आणि आरोपींकडून हस्तगत केलेले साहित्य आणि कबुलीजबाब या तीन आधारांवर खटला चालवण्यात आला होता. मात्र, या तिन्ही पातळीवर आरोपींविरुद्धचा एकही गुन्हा पोलिसांना सिद्ध करता आला नाही, असे नमूद करून न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या विशेष खंडपीठाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला.

तब्बल दोन दशक तुरूंगात काढलेल्या १२ जणांपैकी अनेकजण विविध प्रांतातून येतात. यापैकी कुणी इंजिनिअर, डॉक्टर, दुकानदार तर कुणी सिमी या संघटनेचा सदस्य आहे. निर्दोष मुक्तता केलेल्या १२ जणांची माहिती जाणून घ्या.

फाशी सुनावलेले

१) कमाल अहमद मोहम्मद वकील अन्सारी, २०२१ मध्ये निधन

कमाल अन्सारी (वय ५०) हा बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील बसोपट्टी येथील रहिवासी होता. त्याच्यावर पाकिस्तानमध्ये शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेतल्याचा आणि भारत-नेपाळ सीमेपलीकडून दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना मुंबईत आणल्याचा आरोप होता. माटुंगा येथे त्यानेच बॉम्ब ठेवल्याचाही आरोप त्याच्यावर होता.

२) मोहम्मद फैजल अत्ताउर रहमान शेख

मीरा रोड येथे राहणाऱ्या फैजल शेखवर (वय ५०) लष्कर-ए-तोयबाचा मुंबई युनिटचा प्रमुख असल्याचा आरोप होता. मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटासाठी आर्थिक रसद पुरविल्याचाही आरोप त्याच्यावर होता. याशिवाय कट रचणे, हवालाद्वारे पैसे स्वीकारणे आणि पाकिस्तानी लोकांना आश्रय देणे, बॉम्ब बनविणे आणि ते पेरणे, असेही आरोप फैजलवर होते.

फैजलचे कुटुंबिय काही काळ पुण्यात वास्तव्यास होते. त्यानंतर ते मीरा रोड येथे स्थलांतरित झाले, याठिकाणी फैजलचा सिमी संघटनेशी संपर्क आला. जून २००१ मध्ये पाकिस्तानात जाण्यासाठी फैजलने वैध भारतीय पासपोर्ट मिळवला आणि सहा महिन्यानंतर जानेवारी २००२ मध्ये समझौता एक्सप्रेसमधून त्याने सीमा ओलांडली. पाकिस्तानमधील मुझफ्फराबाद आणि लाहोरमध्ये त्याने लष्कर-ए-तोयबाकडून प्रशिक्षण घेतल्याचा आरोप होता.

३) एहतेशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी

४२ वर्षीय एहतेशाम सिद्दीकीवर पाकिस्तानमधील लोकांना आश्रय देणे, लोकल ट्रेनची माहिती जमवणे, बॉम्ब तयार करणे आणि मीरा-भाईंदरमध्ये बॉम्ब पेरणे, असे आरोप ठेवण्यात आले होते. एहतेशामचे वडील कुतुबुद्दीन सिद्दीकी आखाती देशात काम करत होते. एहतेशाम सिद्दीकीने उत्तर प्रदेशातील जौनपूर हे त्याचे मूळ गाव सोडले आणि तो महाराष्ट्रात आला. त्याने पेणमधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. मात्र शिक्षण अर्धवट सोडून तो सिमी संघटनेत सामील झाला.

कुर्ला येथे असलेल्या सिमीच्या ग्रंथालयातून २००१ साली ताब्यात घेण्यात आले होते. तेव्हापासून तो पोलिसांच्या रडारवर होता. त्यानंतर सिद्दीकीने शहादाह प्रकाशन संस्था स्थापन करून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. या प्रकाशन संस्थेकडून त्याने अनेक पुस्तके छापली. सिद्दीकी काही काळ सिमी संघटनेचा महाराष्ट्र युनिटचा पदाधिकारीही होता.

४) नवीद हुसेन खान रशीद

नवीद रशीद (वय ४४) हा कॉल सेंटरमध्ये काम करणारा कर्मचारी होता. वांद्रे येथे बॉम्ब तयार करण्यात आणि स्फोट घडवून आणण्यात त्याने मदत केली असावी, असे मानले जात आहे. रशीदचा जन्म कुवेतमध्ये झाला होता. आईच्या मृत्यूनंतर तो कुटुंबासह परतला असावा, असे मानले जाते.

माध्यमातील बातम्यांनुसार, रशीदची आई पाकिस्तानी नागरिक होती. कुवेतमध्ये त्या इस्लामिक शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्याच्या कुटुंबियांनी मीरा रोड येथे फ्लॅट विकत घेतला होता. येथे आल्यानंतर रशीदची फैजल शेखशी घट्ट मैत्री झाली. रशीद सिकंदराबाद येथे एका कॉल सेंटरमध्ये काम करत होता. मात्र बॉम्बस्फोटातील आरोपींशी त्याचा संपर्क होता, तसेच त्यादिवशी तो मुंबईत होता, असा आरोप करण्यात येत आहे.

५) आसिफ खान बशीर खान

आसीफ खान (वय ५२) यावर पाकिस्तानी दहशतवाद्यांना मीरा रोड येथे आश्रय दिल्याचा आरोप आहे. बॉम्बसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती, असा आरोप ठेवण्यात आला होता. बोरीवली येथे झालेल्या स्फोटातील बॉम्ब ठेवण्यात त्याचा हात असल्याचाही आरोप होता.

सिव्हिल इंजिनिअर असलेला आसिफ जळगावचा राहणारा होता आणि तो सिमीचा सदस्यही होता. पाईप बॉम्ब पेरण्यासह त्याच्यावर जळगावमध्ये दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. एका आघाडीच्या बांधकाम कंपनीत काम करणारा आसिफ मीरा रोड येथे राहत होता. स्फोटानंतर खान बेळगावला पळून गेला होता. त्याच्या कुटुंबाचा दावा आहे की, स्फोट झाला तेव्हा तो त्याच्या कार्यालयात काम करत होता.

जन्मठेपेची शिक्षा भोगणारे

६) तनवीर अहमद मोहम्मद इब्राहिम अन्सारी

मुंबईतील आग्रीपाडा येथे राहणारा तनवीर अन्सारी (वय ५०) यावर पाकिस्तानातील दहशतवादी शिबिरात उपस्थित राहिल्याबद्दल आणि लोकल ट्रेनचे सर्वेक्षण केल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले होते. तनवीरने नागपूर येथून युनानी औषधात पदवी संपादित केली होती. तसेच तो सिमीशी जोडला गेला होता. तनवीर हा आरोप सातत्याने फेटाळत आला आहे. पण जानेवारी २००१ मध्ये गुजरातमध्ये आलेल्या भूकंपानंतर तिथे सिमीचे मदत पथक गेले होते, या पथकात तनवीरचा समावेश होता.

सिमीने चालवलेल्या ग्रंथालयात बसलेले आढळल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल असूनही २००४ साली त्याला इराणमध्ये तीर्थयात्रेला जाण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यानंतर २००६ साली एका रुग्णालयातून तनवीरला अटक करण्यात आली. तिथे तो रुग्णांवर उपचार करत होता.

७) मोहम्मद माजिद मोहम्मद शफी

बांगलादेश सीमेवरून सहा पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश करण्यास मदत केल्याबद्दल ४६ वर्षीय मोहम्मद माजिद शफी याला दोषी ठरविण्यात आले होते. माजिद कोलकात्याच्या राजा बाजार परिसरात चपलांचे दुकान चालवत होता. पोलिसांनी दावा केला की, तो हवाला रॅकेट चालवत होता आणि वारंवार भारत-बांगलादेश सीमा ओलांडत होता. तथापि, त्याच्या कुटुंबाने दावा केला की, त्यांचे नातेवाईक बांगलादेशमध्ये राहत होते, त्यामुळेच ते सीमा वारंवार ओलांडत होते.

माजिदच्या कुटुंबियांनी असेही म्हटले की, त्याचा दहशतवादाशी काहीही संबंध नव्हता. विशेष म्हणजे माजिदचे कोलकातामधील स्थानिक पोलिसांशी चांगली मैत्री होती. त्याच्या दुकानात पोलीस नेहमी बसत असत. तसेच तो त्याच्या आयुष्यात कधीही मुंबईला गेला नव्हता, असेही त्यांनी म्हटले.

८) शेख मोहम्मद अली आलम

गोवंडी येथील घरात पाकिस्तानी लोकांच्या मदतीने बॉम्ब तयार केल्याचा आरोप मोहम्मद अलीवर (वय ५५) ठेवण्यात आला होता. मुंबईतील शिवाजी नगर येथील झोपडपट्टीमधील रहिवासी असलेला मोहम्मद अली दुबईला जाण्यापूर्वी एका सहकारी बँकेत काम करत होता. एका महिन्यातच तो परतला आणि त्याने युनानी औषधांचा पुरवठा करण्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

मोहम्मद अली हैदराबादहून युनानी औषधे आणायचा आणि येथील युनानी डॉक्टरांना विकायचा. या काळात त्याचा संपर्क सिमी संघटनेतील कार्यकर्त्यांशी आला होता. सिमीचा सदस्य असल्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच २००२-०३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर पोलिसांनी त्याला समन्स बजावले होते.

९) मोहम्मद साजिद मुरगुब अन्सारी

मीरा रोड येथे राहणाऱ्या साजिद अन्सारी (वय ४७) याने बॉम्बसाठी टायमर आणले आणि बॉम्ब तयार करण्यासाठी मदत केल्याच आरोप ठेवण्यात आला होता. तसेच त्याने दोन पाकिस्तानी नागरिकांना आश्रय दिल्याचेही म्हटले गेले. साजिद मीरा रोडच्या नया नगरमध्ये मोबाइल दुरुस्तीचे दुकान चालवत होता. पोलिसांनी दावा केला की, त्याच्या तांत्रिक ज्ञानाचा वापर संपूर्ण कटात करण्यात आला.

१०) मुझम्मिल अताउर रहमान शेख

मुझम्मिल (वय ४०) हा सॉफ्टवेअर इंजिनिअर होता. त्याने पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतल्याचे म्हटले जाते. तसेच ज्या ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट झाले, त्याचे सर्वेक्षण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. बॉम्बस्फोट प्रकरणातील तो सर्वात तरुण आरोपी आहे. त्याचे दोन भाऊ फैसल आणि राहिल हे या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचे मानले जाते. राहिल अटक होण्याआधीच फरार झाला.

२००६ च्या बॉम्बस्फोटापूर्वी मुझम्मिल बंगळुरूतील ओरॅकल कॉर्पोरेशनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून रुजू झाला होता. बॉम्बस्फोटानंतर १३ जुलै रोजी बंगळुरू पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. मात्र बॉम्बस्फोटाच्या दिवशी तो मुंबईत नसल्याने त्याला सोडून देण्यात आले. त्यानंतर त्याचा भाऊ फैजलला अटक झाल्यानंतर मुझम्मिलला पुन्हा अटक करण्यात आली.

११) सुहेल मेहमूद शेख

पुण्यातील रहिवासी सुहेल शेख (वय ५५) याने पाकिस्तानमध्ये शस्त्रास्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतले आणि बॉम्बस्फोटाआधी ट्रेनचे सर्वेक्षण केले, असा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. पुणे कॅम्प परिसरातील भीमपुरा लेन येथील रहिवासी असलेला सुहेल हा कुटुंबातील सर्वात मोठा मुलगा होता. जरीकाम आणि कपडे शिवण्याचे काम करून तो उदरनिर्वाह करत होता.

सुहेल इराणला गेला असावा, असे मानले जाते. कुटुंबियांनी केलेल्या दाव्यानुसार, तो इराणमध्ये सुक्या मेव्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी गेला होता. अटकेनंतर सुहेलच्या आईचे निधन झाले. तर त्याचा २१ वर्षांचा मुलगा उदरनिर्वाहासाठी झगडत आहे.

१२) जमीर अहमद लतीफुर रहमान शेख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरळी येथील रहिवासी असलेल्या जमीरवर (वय ५०) पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतल्याचा, लोकल ट्रेनचे सर्वेक्षण आणि कट रचण्याच्या बैठकांना हजेरी लावल्याचा आरोप होता. त्याने मोमिनुरा येथील खैरुल इस्लाम हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले होते. तसेच १९९६ साली नागपाडा येथील महाराष्ट्र कॉलेजमधून पदवी पूर्ण केली.