एनसीबी मुंबईचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सीबीआयने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे समीर वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे हे नाव चांगलंच चर्चेत आलं होतं. तसंच त्यावेळी मंत्रीमंडळात असलेल्या नवाब मलिक यांनी रोज पत्रकार परिषद घेऊन समीर वानखेडे यांनी खोटी प्रमाणपत्रं देऊन सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता. कोण आहेत हे समीर वानखेडे? त्यांच्यावर काय आरोप झाले होते? आपण जाणून घेऊ.

आर्यन खान प्रकरणामुळे समीर वानखेडे चर्चेत

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक केल्याने समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते. २ ऑक्टोबर २०२१ ला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर आर्यन खान गेला होता. याच क्रूझवरून आर्यन खानला समीर वानखेडेंनी अटक केली होती. त्यानंतर २९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत आर्यन खान आर्थर रोड तुरुंगात होता. आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा या सगळ्यांना त्या कारवाईत अटक झाली होती. आर्यन खानजवळ ड्रग्ज मिळाल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात आर्यन खानला २५ दिवसांनी जामीन मिळाला होता. आर्यन खानवर कारवाई करणारे अधिकारी म्हणून समीर वानखेडे चर्चेत आले होते.

कोण आहेत समीर वानखेडे?

महाराष्ट्राचे रहिवासी असलेले समीर वानखेडे २००८ च्या बॅचचे IRS ऑफिसर आहेत. प्रशासकीय सेवेत लागू झाल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली पोस्टींग मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिशनर म्हणून झाली होती. यानंतर आपल्या कामात दाखवलेल्या प्रावीण्यामुळे समीर वानखेडे यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीला पाठवण्यात आलं. अमली पदार्थविरोधी प्रकरणांमध्ये तपासात समीर वानखेडे यांचा विशेष हातखंडा मानला जातो.

कस्टम विभागात आंतरराष्ट्रीय विमानतळावर सहाय्यक आयुक्त म्हणून समीर वानखेडे यांनी काही वर्षं काम केलं. त्यानंतर महसूल गुप्तचर संचलनालय आणि दहशवादी कारवायांशी संबंधित प्रकरणांचा तपास करणाऱ्या NIA मध्येही त्यांनी काम केलं आहे. ऑगस्ट 2020 मध्ये समीर वानखेडे यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागाचे संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला होता.

नवाब मलिक यांचे आरोप काय होते?

आर्यन खान प्रकरणात नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर (NCB) जोरदार टीका केली होती. मलिक यांनी एनसीबीचे साक्षीदार फिक्सर असल्याचा आरोप केला होता. NCB केवळ ठराविक साक्षीदारांद्वारे बनावट छापे मारते. असा आरोप केला होता.

तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची बहीण जस्मिन वानखेडे आणि फ्लेचर पटेल नावाच्या व्यक्तीचे फोटो शेअर करुन काही सवाल उपस्थित केले होते. समीर वानखेडे यांना शाहरुख खानकडून पैसे वसूल करायचे होते असाही आरोप नवाब मलिकांनी केला होता.

फ्लेचर पटेल हा जास्मिन वानखेडेंचा भाऊ असल्याचं म्हटलं जात आहे. पण हाच व्यक्ती एनसीबीच्या अनेक प्रकरणांमध्ये पंच किंवा साक्षीदार कसा काय असतो? असा सवाल देखील नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता.

नवाब मलिक यांनी वानखेडेंवर निशाणा साधताना आणि म्हटले की, समन्स बजावण्यात आलेले सेलिब्रिटी हे मालदीवमध्ये होते तेव्हा समीर वानखेडे पैसे गोळा करायला तिकडे गेले होते का?

समीर वानखेडे हे जातीने मुस्लिम असून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी खोटं जात प्रमाणपत्र सादर केल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

त्यावेळी जे आरोप मलिक यांनी केले होते त्यात त्यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचा फोटोही त्यांनी ट्विट केला होता, त्यानंतर त्यांच्या सासऱ्यांचं एक वक्तव्यही समोर आलं होतं की समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत ते देखील त्यांनी सांगितलं होतं.

समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचाही आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समीर वानखेडेंचं बॉलिवूड कनेक्शन काय?

बॉलिवूड कलाकारांवर कारवाई करणारे अधिकारी म्हणून समीर वानखेडे ओळखले जातात. त्यांची दुसरी पत्नी क्रांती रेडकर आहे. क्रांती रेडकर मराठी सिनेसृष्टीतील आणि नाट्यसृष्टीतली अभिनेत्री आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज आणि बॉलिवूड असं प्रकरण समोर आलं होतं. त्यावेळी एनसीबीच्या रडारवर रिया चक्रवर्ती होती. त्याचप्रमाणे दीपिका पदुकोण, सारा अली खान, रकुलप्रीत सिंह, श्रद्धा कपूर या सगळ्यांनाही त्यांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. समीर वानखेडे आणि त्यांनी केलेली कारवाई तसंच त्यानंतर निर्माण होणारे वाद हे जुनं नातं आहे कारण आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागात काम करत असतानाही बॉलिवूड कलाकारांना टार्गेट केल्याचे आरोप त्यांच्यावर झाले होते.