मुंबईतल्या माटुंगा या ठिकाणी एक रेस्तराँ आहे. दाक्षिणात्य चवीचे पदार्थ या ठिकाणी अत्यंत उत्तम मिळतात. होय तुम्ही बरोबर ओळखलं, आम्ही सांगत आहोत ते रामाश्रय या रेस्तराँबाबतच. मागील ८६ वर्षांपासून रामाश्रय मुंबईतल्या खवय्यांच्या पसंतीस उतरलेलं रेस्तराँ आहे. मुंबईतल्या जुन्या रेस्तराँपैकी एक रामाश्रय आहे.
आठवड्याचे शेवटचे तीन दिवस असते प्रचंड गर्दी
शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांत साधारण २५०० प्लेट इडली, डोसा या रेस्तराँमध्ये ग्राहकांना त्यांच्या ऑर्डरप्रमाणे दिला जातो. एवढंच नाही तर हेमा मालिनी, कपूर घराण्यातले अनेक स्टार्स, विद्या बालन, विकी कौशल या आणि अशा अनेक तारे तारकांचं हे आवडतं हॉटेल आहे. मागच्या वर्षी पत्रलेखा आणि राजकुमार राव या दोघांचा या हॉटेलमधल्या पदार्थांची चव चाखतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. शिवाय या रेस्तराँला नियमितपणे भेट देणाऱ्या ग्राहकांचीही कमी नाही. लोक वीकएंडला तर रांगा लावून आपल्या आवडत्या पदार्थांची चव चाखण्यासाठी वेटिंगवर असतात.
रामाश्रयच्या मालकांनी काय सांगितलं?
रामाश्रयचे मालक अमरजीत शेट्टी आणि त्यांचे भाऊ अक्षय यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की आज या हॉटेलचं जे काही यश आहे ते फक्त आणि फक्त आमच्या ग्राहकांमुळे आहे. आम्ही ग्राहकांच्या पसंतीस उतरलो आणि त्यामुळेच आम्ही इतका लांबचा पल्ला गाठू शकलो. आमच्या रेस्तराँमध्ये काही पिढ्यांपासून येणाऱेही ग्राहक आहेत. आमचे आजोबा श्यामबाबू शेट्टी हे १९३९ मध्ये उडुपीहून मुंबईला आले. सुरुवातीला त्यांनी २०० स्क्वेअर फुटांचं एक हॉटेल सुरु केलं. त्यात फक्त चार टेबल आणि खुर्च्या होत्या. इडली, मेदुवडा, उपमा, डोसा, गोली भजी, केळी भजी तसंच चहा कॉफी विकण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीला या रेस्तराँचं नाव उडुपी रेस्तराँ असंच होतं. लोकांना आम्ही देत असलेल्या पदार्थांची चव, सांबार, चटणी यांची चव आवडली.
आजोबांकडून जयराम आणि भास्कर शेट्टींकडे आलं रेस्तराँ
माझ्या आजोबांकडून हे रेस्तराँ जयराम आणि भास्कर शेट्टी या दोन भावांकडे आलं. या दोघांनी मग व्यवसायाचा विस्तार वाढवला. त्यांनी हॉटेलचा पसारा वाढवला. तसंच रवा डोसा, नीर डोसा असे प्रकारही वाढवले. ग्राहक प्रथम हे त्यांचं ध्येयं होतं. आजोबांच्या काळातली चव पुढेही कायम राहिली त्यामुळे आमचे ग्राहक वाढत गेले. आता तर अशी स्थिती असते की अनेकदा वेटिंगवर लोक उभे असतात.
रामाश्रय मध्ये कसे बदल झाले?
अक्षय शेट्टींनी २००० मध्ये या व्यवसायात पाऊल ठेवलं. तर अमरजीत २०१२ मधअये आले. हा १२ वर्षांचा काळ रामाश्रयसाठी महत्त्वाचा ठरला. महत्त्वाचे बदल घेऊन रामश्रय बदललं. आम्ही आमच्या रेस्तराँमध्ये मिळणारे पदार्थ, सांबार, चटणी एवढंच काय चहा आणि कॉफीची चवही तशीच ठेवली आहे. त्यामुळे लोक आमच्याकडे येतात. कोविडच्या नंतर लालबागमध्ये आम्ही एक शाखा सुरु केली. तसंच माटुंगा येथील रेस्तराँ हे १२० लोक बसू शकतील इतक्या क्षमतेचं केलं. २००९ ते २०१४ चा कालावधी रामाश्रयसाठी महत्त्वाचा ठरला. गेल्या दशकांच्या मेहनतीचं फळ या काळात आम्हाला मिळालं असंही शेट्टी यांनी सांगितलं. २०२४ मध्ये म्हणजेच गेल्या वर्षी आम्ही गिरगावातही १२० लोकांच्या आसन क्षमतेचं रेस्तराँ सुरु केलं आहे. पहाटे पाच वाजता हॉटेल सुरु होतं. आमचे अनेक पदार्थ एअरपोर्टलाही जातात. आमच्या आजोबांनी सुरु केलेला व्यवसाय आज इथवर आलाय याचा खचितच आनंद होतो.