मुंबई: आईच्या अंगात भूत असल्याचे सांगत एका महिला मांत्रिकाने तिच्या मुलीकडून तब्बल सव्वा तीन लाख रुपयांचे दागिने घेतल्याचा प्रकार विक्रोळी येथे समोर आला आहे. ही बाब मुलीच्या घरी समजल्यानंतर त्यांनी याबाबत पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी महिलेला अटक केली आहे.

विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेला अनेक वर्षांपासून मानसिक आजार आहे. तिच्यावर शीव रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत. मात्र ती या आजारातून बाहेर पडत नसल्याने तिच्या पतीने तिला परिसरात राहणाऱ्या मेहजबिन रईस खान (३८) या मांत्रिक महिलेकडे नेले होते. सुरुवातीला दोन ते तीन हजार रुपये घेऊन तिने महिलेला काही उपाय सांगितले. मात्र त्यानंतर अनेकदा महिलेची मुलगी तिला घेऊन या मांत्रिक महिलेकडे जात होती. यावेळी या मांत्रिक महिलेने तुझ्या आईच्या अंगात भूत असल्याचे सांगून मुलीच्या मनात भीती घातली.

शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. त्याचेच भूत आईच्या अंगात असून त्याला शांत करण्यासाठी काही दागिने द्यावे लागतील असे या मांत्रिक महिलेने मुलीला सांगितले होते. मुलीनेही त्या महिलेवर विश्वास ठेवून तिच्या सांगण्यावरून अनेकदा घरातील सोन्याचे दागिने मांत्रिक महिलेला दिले. मात्र अचानक काही दिवसांपूर्वी घरातील दागिने गायब झाल्याचे मुलीच्या काकाच्या लक्षात आले. त्याने घरात चौकशी केल्यानंतर तब्बल ३ लाख १५ हजारांचे दागिने नसल्याचे उघडकीस आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरुवातीला त्या दागिन्यांबाबत कोणीही काहीही बोलत नव्हते. अखेर ते दागिने आईच्या उपचारासाठी मांत्रिक महिलेला दिल्याची कबुली मुलीने दिली. त्यानुसार मुलीच्या काकाने पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पार्कसाईट पोलिसांनी रविवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करून मांत्रिक महिलेला अटक केली आहे.