मुंबई : म्हाडाच्या वांद्रे येथील म्हाडा भवनातील दुसऱ्या मजल्यावरील मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या सहमुख्य अधिकाऱ्याच्या कार्यालयात एका महिलेने अनोखे आंदोलन केले. आपल्या काही मागण्यांसाठी या महिलेने ५० रुपयांच्या नोटांच्या माळा घालून अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. इतकेच नव्हे तर या महिलेने ६,६५० रुपये उधळले. तिने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचाही प्रयत्न केला, मात्र सुरक्षा रक्षकांनी वेळीच तिला रोखून म्हाडा भवनाबाहेर नेल्याने अनुचित प्रकार टळला. दरम्यान खेरवाडी पोलिसांनी नोटा जप्त केल्या असून या महिलेविरोधात तक्रार दाखल करण्याची कार्यवाही दुरुस्ती मंडळाकडून सुरू होती.

शुक्रवारी दुपारी अडीच-तीनच्या दरम्यान दुरुस्ती मंडळाचे सहमुख्य अधिकारी उमेश वाघ यांना भेटण्यासाठी ही महिला आली होती. मात्र वाघ प्रकल्प पाहणी दौऱ्यावर असल्याने त्यांची भेट झाली नाही. त्यानंतर या महिलेने गळ्यात ५० रुपयांच्या नोटांची माळ घालून अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या गोंधळाची माहिती मिळताच सुरक्षा रक्षकांनी दुसऱ्या मजल्यावरील सहमुख्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे धाव घेतली. या महिलेला अडविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर या महिलेने कार्यालयात नोटा उधळल्या आणि दुसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र तेवढ्यात सुरक्षा रक्षकांनी तिला अडवले. त्यानंतर तिला म्हाडाच्या आवरात आणले आणि त्यानंतर ती महिला तेथून निघून गेली. मात्र ही महिला नेमकी कोण होती, तिचे अधिकाऱ्यांकडे काय काम होते, तिची नेमकी मागणी काय होती याची कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

हा सर्व गोंधळ संपल्यानंतर म्हाडाने खेरवाडी पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी म्हाडात धाव घेत नोटा जप्त केल्या असून त्यात एकूण ६६५० रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर या महिलेविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती म्हाडातील अधिकाऱ्यांनी दिली. ‘आपण आज सकाळपासून म्हाडा उपाध्यक्षांसह प्रकल्प पाहणी दौऱ्यावर आहोत. ती महिला कोण आणि कशासाठी आली होती याची आपल्याला कल्पना नाही’, असे उमेश वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. या प्रकरणी पुढे काय कारवाई करायची याचा निर्णय दक्षता विभाग घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्हाडा सुरक्षा रक्षकांची महिला पत्रकारावर अरेरावी

म्हाडा भवनाच्या दुसऱ्या मजल्यावर हे सर्व नाट्य घडत असताना तिथे एक महिला पत्रकार उपस्थित होती. या पत्रकाराने या नाट्याचे चित्रिकरण करण्यास सुरुवात केली असता सुरक्षा रक्षकांनी महिला पत्रकाराला रोखले. चित्रकरण डिलिट करण्यास करण्यास सांगितले. यावरून उभयतांमध्ये शाब्दीक चकमक उडाली. सुरक्षा रक्षकांच्या गैरवर्तनाबाबत पत्रकारांनी नाराजी व्यक्त केली असून याबाबत म्हाडाकडे तक्रारही केली आहे.