मुंबई : हल्ली चाळीशीतच रजोनिवृत्ती येते. याला अकाली रजोनिवृत्ती म्हणतात. डॉक्टर सांगतात की, वयाच्या ४० वर्षापूर्वी स्त्रीच्या अंडाशयाचे कार्य थांबते तेव्हा त्याला अकाली रजोनिवृत्ती, प्रीमेच्योर ओव्हेरियन फेल्युअर किंवा प्रीमेच्योर ओव्हेरियन इन्सफिशियन्सी असे म्हणतात.
वाढता ताणतणाव, धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचा अभाव आणि आहाराच्या चुकीच्या सवयी यासारखे जीवनशैलीसंबंधीत घटक याच मोठी भूमिका बजावत आहेत. वेळीच लक्षणे ओळखणे आणि योग्य वैद्यकीय मार्गदर्शन महिलांना त्यांच्या प्रजनन आरोग्याचे रक्षण करण्यास मदत करू शकते.
अकाली रजोनिवृत्ती, ज्याला प्रीमेच्योर ओव्हेरियन फेल्युअर किंवा प्रीमेच्योर ओव्हेरियन इन्सफिशियन्सी असे म्हणतात, हे तेव्हा होते जेव्हा अंडाशय रजोनिवृत्तीच्या नैसर्गिक वयापेक्षा खूप लवकर स्त्रीबीज आणि हार्मोन्स तयार करणे थांबवते. रजोनिवृत्तीचे सरासरी वय सुमारे ४५ ते ५० वर्षे असले तरी, काही महिलांमध्ये ते खूप लवकर सुरू होते, कधीकधी त्यांच्या ३० च्या सुरुवातीच्या काळातही यास सुरुवात होऊ शकते असे अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अमरजा परांजपे यांनी सांगितले.
जीवनशैलीतील बदल, अनुवंशिकता, स्वयंप्रतिकार रोग, केमोथेरपी सारख्या काही वैद्यकीय उपचार आणि गंभीर संसर्ग देखील लवकर रजोनिवृत्तीला कारणीभूत ठरू शकतात. सामान्य लक्षणांमध्ये अनियमित किंवा चुकलेली मासिक पाळी, रात्री घाम येणे, मूड स्विंग्ज, योनीमार्गाचा कोरडेपणा आणि प्रजनन क्षमता कमी होणे यांचा समावेश आहे. गेल्या २-३ महिन्यांत, मला भेटणाऱ्या १० पैकी २ महिलांना अकाली रजोनिवृत्तीचा सामना करावा लागला आहे.
अनेक महिला या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, त्यांना तात्पुरते शारीरीक बदल समजतात. ज्या महिला अकाली रजोनिवृत्तीचा सामना करतात त्यांना वंध्यत्व, ऑस्टियोपोरोसिस, हृदयरोग आणि नैराश्याचा धोका अधिक असतो. तरुण वयात इस्ट्रोजेनचे नुकसान हे हाडांच्या ताकदीवर, हृदयाच्या आरोग्यावर आणि मानसिक आरोग्यावरही दीर्घकालीन परिणाम करते असेही डॉ परांजपे म्हणाल्या.
अकाली रजोनिवृत्तीची जोखीम कमी करण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि तणावाचे व्यवस्थापन तसेच निरोगी जीवनशैली बाळगणे गरजेचे आहे. अनियमित मासिक पाळीच्या समस्येबाबत स्त्रीरोग तपासणी आणि वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.
काही प्रकरणांमध्ये हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी आणि प्रजनन क्षमता टिकवून ठेवण्याचे पर्याय महिलांना या स्थितीचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यास मदत करू शकतात. अकाली रजोनिवृत्तीची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे महिलांना त्यांचे प्रजनन आरोग्य चांगले राखण्यास मदत करू शकते असे ठाणे जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोजतज्ज्ञ डॉ श्रेया शेळके यांनी सांगितले.
आमच्याकडे उपचारांसाठी येणाऱ्या बहुतांश महिलांमध्ये तिशी उलटल्यानंतर आणि चाळीशीच्या सुरुवातीलाच अकाली अंडाशय निकामी होत असल्याची समस्या आढळून येते, ज्यामुळे अकाली रजोनिवृत्तीची समस्या उद्भवते. गेल्या २ ते ३ महिन्यांत, ओपीडीमध्ये दाखल झालेल्या दहा पैकी एका महिलेला अकाली रजोनिवृत्ती झाल्याचे आढळून आले. हे केवळ महिलांच्या प्रजननक्षमतेवर परिणाम करत नाही तर हाडे कमकुवत करते, हृदयरोग आणि भावनिक आरोग्य समस्यांचा धोका देखील वाढवते.
अकाली रजोनिवृत्ती ही अनुवंशिकता, दीर्घकालीन ताण, धूम्रपान, मद्यपान, पुरक आहाराची कमतरता आणि स्वयंप्रतिकार स्थितींमुळे होऊ शकते. महिलांना यामुळे अनियमित किंवा चुकलेली मासिक पाळी, रात्री घाम येणे, मूड स्विंग, योनीमार्गाचा कोरडेपणा आणि गर्भधारणेमध्ये अडचण येऊ शकते हे लक्षात घेऊन स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे झायनोव्हा शाल्बी रूग्णालयातील प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रियंका सोनवणे यांनी सांगितले.