मुंबई : डॉल्फिन, व्हेल किंवा पोर्पांईस यांच्यासाठी समुद्र म्हणजे केवळ निवासस्थान नाही, तर संवादाचे एक विस्तीर्ण विश्व आहे. यासारखे सस्तन प्राणी अन्न शोधण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि पर्यावरणाचा अंदाज घेण्यासाठी आवाजांचा वापर करतात. ‘ऑक्युस्टिक मॉनिटरींग’ या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्राण्यांचे आवाज रेकॉर्ड करून त्यांचे वर्तन, हालचालींचे मार्ग, गटांचा आकार आणि परस्पर संवाद अभ्यासता येतो. या संशोधनामुळे समुद्री सस्तन प्राण्यांचे संवर्धन आणि त्यांचे अधिवास सुरक्षित ठेवणे शक्य होत असल्याचे डॉ. ईशा बोपर्डीकर यांनी सांगितले.
जागतिक डॉल्फिन दिवसाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयतर्फे (सीएसएमव्हीएस) आयोजित “सीक्रेट्स ऑफ द सी” व्याख्यानमालिकेचा दुसरा भाग शुक्रवारी पार पडला. ‘व्हॉइसेस फ्रॉम द डीप सी : अंडरस्टँडिंग मरीन मॅमल्स थ्रू देअर साऊंड्स’ या विषयावर डॉ. ईशा बोपर्डीकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी समुद्रातील प्राणी दृष्टीपेक्षा ध्वनींवर अधिक अवलंबून असतात.
खोल समुद्रात अंधार असल्यामुळे व्हेल, डॉल्फिन आणि पोर्पांईस यांसारखे सस्तन प्राणी अन्न शोधण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि पर्यावरणाचा अंदाज घेण्यासाठी आवाजांचा वापर करत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच समुद्र संवर्धनाचे महत्त्वही अधोरेखित केले. मानवी हस्तक्षेप, ध्वनी प्रदूषण आणि हवामान बदलामुळे समुद्री प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. ध्वनी अभ्यासाच्या माध्यमातून या धोक्यांचा मागोवा घेऊन उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे डॉ. बोपर्डीकर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सीएसएमव्हीएसची “सीक्रेट्स ऑफ द सी” व्याख्यानमालिका भारताच्या सागरी परिसंस्थांचा परिचय करून देते. या मालिकेतून कधी कांदळवन, तर कधी किनाऱ्यावरील जैवविविधता आणि कधी खोल समुद्रातील जैवविविधतेवर चर्चा केली जाते. संशोधक आणि तज्ज्ञांचे अनुभव व्याख्यानाद्वारे सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाते. सीएसएमव्हीएसच्या या उपक्रमामुळे सागरी जीवसृष्टीविषयी जिज्ञासा निर्माण झाली असून, संवर्धनाकडे एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे.