‘विधायक कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना यशवंत देवस्थळी यांनी नेहमीच आर्थिक पाठबळ दिले. त्यांच्या निधनामुळे सढळ हस्ते मदत करत प्रोत्साहन देणारा निरपेक्ष दाता हरपला,’ अशा भावना विविध सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवस्थळी यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या माध्यमातून अनेक संस्थांना मदतीचा हात दिला. सुरुवातीपासूनच ते या उपक्रमाशी जोडले गेले होते. दरवर्षी या उपक्रमात निवड झालेल्या संस्थांना भरभरून अर्थसाहाय्य करण्याचा शिरस्ता त्यांनी अखेपर्यंत पाळला.

कुडाळ येथील विज्ञान प्रसार केंद्राच्या उपक्रमांना त्यांनी नेहमीच सहकार्य केले. त्यांनी केलेल्या अर्थसाहाय्यातून संस्थेच्या अनेक प्रकल्पांनी आकार घेतला. ‘देवस्थळी २००९ पासून संस्थेला अर्थसाहाय्य करत होते. वर्षांला २०० ते २५० शाळांमध्ये आम्ही विज्ञान प्रयोग दाखवतो. त्या उपक्रमाला त्यांचे मोठे सहकार्य होते. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमात २०१८ मध्ये संस्थेची माहिती आली, त्या वेळी त्यांनी ५ लाख रुपयांची देणगी संस्थेला दिली. त्यातून प्रयोगशाळा उभी करण्यात आली,’ असे संस्थेचे सतीश नाईक यांनी सांगितले. ‘लोकसत्ता’च्या उपक्रमामुळे देवस्थळी संस्थेशी जोडले गेले. त्यांनी दिलेल्या देणगीतून ‘आविष्कार’च्या प्रकल्पांना मोठे साहाय्य झाले,’ असे रत्नागिरी येथील नितीन कानविंदे यांनी सांगितले.

‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमात ठाण्यातील ‘विद्यार्थी विकास योजने’ची माहिती प्रसिद्ध झाल्यानंतर देवस्थळी हे आमच्या प्रकल्पाशी जोडले गेले. त्यांनी सातत्याने अर्थसहाय्य करत प्रोत्साहन दिले, असे सांगत ‘विद्यार्थी विकास योजने’चे रविंद्र कर्वे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. देवस्थळी हे विद्यार्थी विकास योजनेचे हितचिंतक, आधारस्तंभ होते, असे कर्वे म्हणाले.

‘आमचा प्रकल्प ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाने पुनरुज्जीवीत केला. या उपक्रमातून जे दाते प्रकल्पाशी जोडले गेले त्यामध्ये देवस्थळी यांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. मिळालेल्या अर्थसाहाय्यातून सर्पराज्ञी प्रकल्प उभा राहिला, प्राण्यांसाठी निवारा, त्यांच्या खाद्याचा प्रश्न मार्गी लागला,’ असे बीड येथील ‘वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड सँक्च्युरी असोसिएशन’चे सिद्धार्थ सोनवणे यांनी सांगितले. ‘देवस्थळी यांच्याशी वैयक्तिक परिचय झाला नाही. मात्र ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाच्या माध्यमातून संस्थेला मोठे अर्थसाहाय्य मिळाले. त्यातील एक प्रमुख दाते देवस्थळी हे होते. या निधीमुळे संस्थेला मोठा आधार मिळाला,’ असे कोल्हापूर येथील ‘हेल्पर्स ऑफ दी हॅण्डिकॅप्ड’ या संस्थेच्या माजी अध्यक्ष नसीमा हुजरूक यांनी सांगितले.

साधेपणा.. : देवस्थळी यांच्याशी व्यक्तिगत आणि संस्थात्मक अशा दोन्ही पातळ्यांवर जोडला गेलो आणि समृद्ध झालो, अशी भावना आनंदवनच्या महारोगी सेवा समितीचे कौस्तुभ आमटे यांनी व्यक्त केली. कॉर्पोरेट विश्वात मोठय़ा पदावर असूनही त्यांनी जपलेला साधेपणा अवाक करणारा होता. सामाजिक संस्थांना भरभरून मदत करताना एका हाताने दिलेले दान दुसऱ्या हातालाही कळू न देणारे हे आदरणीय व्यक्तिमत्त्व होते, असे आमटे म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashwant devasthali pass away abn
First published on: 19-11-2020 at 00:00 IST