मुंबई: विदेशात नोकरीचे आमिष दाखवून तरुणांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार मालाड येथे उघडकीस आला आहे. तरुणांना बोगस नियुक्ती पत्रक देऊन कंपनीचे संचालक पसार झाले आहेत. आतापर्यंत ३८ तरुणांनी फसवणुक झाल्याची तक्रार दिली असून त्यांची सव्वा कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. मालाड पोलिसांनी कंपनीच्या तीन संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मालाड पश्चिमेच्या एसव्ही रोड येथील एका मॉलमध्ये ‘एरॉन ओव्हरसी’ या नावाने एक कार्यालय सुरू करण्यात आले होते. लेक्झमबर्ग या देशातील सॉफीटेल या पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी लावून देण्याची जाहिरात या कंपनीने समाजमाध्यमांवर दिली होती. हॉटेलमध्ये किचन स्टाफ, वाहनचालक, हाऊसकिपिंग, स्टोअर किपर, सुरक्षारक्षक आदी पदांसाठी जागा रिक्त असून त्यात नोकरी लावण्याचा दावा कंपनीने केला होता.
या जाहिरातीची एक लिंक देण्यात आली होती. त्यासाठी लागणाऱ्या प्रक्रियेसाठी नोंदणी शुल्क, वैद्यकीय तपासणी आदींसाठी शुल्क आकारण्यात आले होते. गलेलठ्ठ पगार, तात्काळ नियुक्तीपत्र देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पुणे तसेच इतर शहरातील अनेक बेरोजगार तरुणांनी ऑनलाईन तर काहींनी प्रत्यक्षात कंपनीत येऊन अर्ज केला होता. काही दिवसांनी त्यातील काही तरुणांना व्हिसासह नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले होते. त्यामुळे नोकरी मिळाल्याची खात्री पटली होती. परंतु नंतर या व्हिसासह नियुक्ती पत्राची शहानिशा केल्यानंतर त्यांना देण्यात आलेले दस्तावेज बोगस असल्याचे उघडकीस आले होते.
फसवणूक झालेल्या तरुणांनी नंतर कंपनीत धाव घेतली होती. मात्र तेथे गेल्यानंतर त्यांना कंपनीच्या कार्यालयाला टाळे लागल्याचे आढळून आले. कंपनीतील तथाकथित संचालक अमन शेख, जिग्नेश राठवा आणि एकता अहिरे उर्फ दृष्टी या तिघांनी आपापले फोनही बंद केले होते. त्यामुळे फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणांनी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. फसवणूक झालेले सर्व तरूण हे मध्यमवर्गीय घरातील आहेत. कुणी उसने पैसे घेऊन तर कुणी मुदत ठेव मोडून पैसे जमा केले होते.
आमच्याकडे आतापर्यंत ३८ तरुणांनी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्याकडून ६० हजारांपासून ४ लाख रुपये प्रक्रियेच्या नावाखाली घेण्यात आले होते. अशी माहिती मालाड पोलिसांनी दिली. या त्रिकुटाविरोधात मालाड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६ (२), ३१९ (२), ३१८ (४), ३३६ (२), ३३८, ३४० (२) ६१ (२) ३(५) अंतर्गत फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आणखी अनेक तरुणांची अशाप्रकारे फसवणूक झाली असण्याची शक्यता मालाड पोलिसांनी वर्तवली आहे. मालाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कापसे सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.