विदर्भात उष्णतेची लाट, रस्ते निर्मनुष्य
विदर्भात उष्णतेची तीव्र लाट असून, उपराजधानीने मोसमी तापमानाचा आणखी एक उच्चांक नोंदवला आहे. शनिवारी नागपुरातील कमाल तापमान ४६.६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २९.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. सकाळपासूनच अंग भाजून काढणारा उन्हाचा मारा नागरिकांना बसला आणि काही तासातच निर्मनुष्य रस्त्ये पहायला मिळाले.
विदर्भात मे महिना अंगाची लाहीलाही करणारा असतो. या महिन्याअखेरीस तापमानाचा सर्वाधिक तडाखा मध्य भारतात बसून विदर्भापासून मध्य प्रदेशपर्यंत ही लाट पसरते. या काळात पारा ४८-४९ अंश सेल्सिअसपर्यंत जातो. यंदा या महिन्याच्या उत्तरार्धातच विदर्भाने उष्णतेची लाट अनुभवली. चार दिवसांपूर्वी अकोल्याने ४७ अंश सेल्सिअस तापमान गाठले होते. नागपूरपाठोपाठ वर्धा ४६.१ आणि ब्रम्हपुरी व चंद्रपूरने अनुक्रमे ४५.८ व ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली. केंद्र व राज्य सरकारीा कार्यालयांना सुटी असल्याने अनेकांनी शनिवारी घरात राहणे पसंत केले. खासगी क्षेत्रातील चाकरमान्यांना घराबाहेर पडण्यावाचून पर्याय नव्हता. उन्हाच्या तीव्र लाटेत कूलरही काम करेनासे झाले आहेत. एरवी वर्दळीच्या अनेक रस्त्यांवर दुपारीच नव्हे, तर सायंकाळीही शुकशुकाट दिसून आला.
ही लाट आणखी काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून, राज्यात सावधानतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी शक्यतोवर घरातच रहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरातचा काही भाग तसेच खान्देश, विदर्भात किमान दोन दिवस तरी ही लाट कायम राहील, असा अंदाज आहे.