शिक्षण विभागाचा निर्णय; मुख्याध्यापकांकडून हमीपत्र लिहून घेणार

गेल्या काही वर्षांत खासगी शिकवणी वर्गाची वाढती संख्या बघता त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शाळेतील उपस्थितीवर झाला आहे. शाळेच्या वेळेत विद्यार्थी खासगी शिकवणी वर्गाला जाणार नसून ते वर्गातच असतील, याची हमी घेणारे एक हमीपत्र मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून लिहून घेतले जाणार आहे आणि ते दिले नाही तर शिक्षक व संस्थाचालकावर कारवाई केली जाणार आहे. १ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या निर्णयामुळे शाळा प्रशासनाने चांगलीच धास्ती घेतली असून त्यांनी हमीपत्र लिहून देण्यास सुरुवात केली आहे.

दहावी उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतात, मात्र तेथे उपस्थित न राहता खासगी शिकवणी वर्गातून अभ्यासक्रम पूर्ण करतात. त्यामुळे शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर परिणाम झाला आहे. शिकवणी वर्ग चालविणारे शिक्षकही मुलांना सूट देतात.

त्यामुळे शाळा ओस पडू लागल्या आहेत. शाळेमध्ये कागदोपत्री विद्यार्थ्यांची पटसंख्या फुगलेली दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र शाळेत विद्यार्थी दिसत नाही. विद्यार्थी शाळेच्या वेळेत शिकवणी वर्गाला जात असल्याचे शिक्षण विभागाला आढळून आले. परीक्षेच्या दिवसातही शिकवणी वर्ग सुरूच असतात. अनेक शाळा आणि प्रशासन आणि शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षकांमध्ये साटेलोटे असल्यामुळे शाळेचे व्यवस्थापन संबंधित शिक्षकांवर कारवाई करीत नाही.

या संदर्भात अनेक संघटनांनी शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. या संदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयाला निवेदन देऊन अशा शिकवणी वर्ग शिक्षकांवर आणि शाळांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यामुळे यावेळी शिक्षण विभागाने मुख्याध्यापक आणि शिक्षकाकडून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत हमीपत्र लिहून घेण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण विद्यार्थ्यांच्या १० टक्केपेक्षा कमी विद्यार्थी संख्या आढळल्यास संबंधित शाळेवर कारवाई केली जाणार आहे. शिक्षण उपसंचालकांनी या संदर्भात आदेश काढला असून हमीपत्राची प्रत आणि आदेश शहरातील सर्व शाळांना पाठविण्यात आला आहे. त्यांनी तीन दिवसात हमीपत्र भरून द्यावयाचे आहे. ते जर न दिल्यास शाळेची उपस्थिती १० टक्केपेक्षा कमी आहे असे समजून शाळेवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

शाळेतील शिक्षक शाळेच्या वेळेत खासगी शिकवणी वर्ग घेत असल्याच्या शिक्षण विभागाकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे शिकवणी वर्ग न लावणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांवर अन्याय होतो. त्यामुळ शाळांमध्ये १० टक्केपेक्षा कमी उपस्थित असेल तर अशा शाळाची तपासणी करून जे शिक्षक शिकवणी वर्ग घेत असतात अशांकडून हमी पत्र भरून घेतले जाणार आहे. त्यांनी ते दिले नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

अनिल पारधी, शिक्षक उपसंचालक, नागपूर विभाग