नरखेड, काटोल, रामटेक ‘सॅटेलाईट सिटी’

नागपूर : ब्रॉडगेज मेट्रोमुळे जिल्ह्य़ातील तालुक्याची ठिकाणे रेल्वेमार्गाशी जुळतील. काटोल, नरखेड, रामटेक, सावनेर ही शहरे सॅटेलाईट सिटी म्हणून विकसित केली जातील. अजनी हे जगातील सर्वात सुंदर स्थानक होईल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

अ‍ॅक्वालाईनच्या लोकार्पणाप्रसंगी ते बोलत होते. ब्रॉडगेज मेट्रोचा जनक मीच असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले. हा प्रकल्प आकाराला आला तर नरखेड ते बडनेरा, गोंदिया-चंद्रपूर आणि वडसापर्यंत मेट्रो जाईल. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर त्याला चालना मिळेल. मेट्रो टप्पा दोनमध्ये हिंगणा, बुटीबोरी, कामठी-कन्हानपर्यंत मेट्रो जाईल. ९ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून त्याला राज्य सरकारने मंजुरी द्यावी, अशी विनंती  गडकरी यांनी केली. अजनीमध्ये जगातील सर्वात सुंदर रेल्वेस्थानक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जागेची आवश्यकता आहे. मागच्या सरकारने कारागृह शहराबाहेर हलवण्याचा निर्णय घेतला होता. यासंदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. तो मंजूर झाला तर काम पूर्ण होईल, असे गडकरी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यभरात मेट्रोचे प्रकल्प सुरू आहेत. त्यांना लागणारे डबे तयार करण्याचा कारखाना सिंदी रेल्वेजवळ सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. त्याला राज्य सरकारने सहकार्य करावे, असेही गडकरी म्हणाले.