‘सीएसआरआय’चा निर्णय, वाटपातील भेदभाव अखेर संपुष्टात

देशातील सर्वोच्च संशोधन संस्थेतील संशोधक विद्यार्थ्यांच्या वाढीव शिष्यवृत्ती वाटपातील बहुचर्चित भेदभाव विद्यार्थ्यांनी पाठपुरावा केल्यानंतर अखेर संपुष्टात आला आहे.  वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआरआय) सर्व संशोधक विद्यार्थ्यांना समान शिष्यवृत्ती देण्यास प्रारंभ केला आहे.

‘सीएसआरआय’च्या चुकीच्या धोरणामुळे देशातील विविध संशोधन संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती वाटपात भेदभाव केला जात होता. या संदर्भात ‘लोकसत्ता’ने १० फेब्रुवारीला वृत्त प्रकाशित केले होते. शिवाय संशोधक विद्यार्थ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अखेर ‘सीएसआरआय’ला त्यांची चूक लक्षात आली आणि सर्व संशोधक विद्यार्थ्यांना समान शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेतला. देशातील सर्व संशोधक संस्थांमधील विद्यार्थ्यांना एप्रिलमध्ये वाढीव शिष्यवृत्ती देण्यात आली. शिवाय ऑक्टोबर २०१४ पासून वाढीव शिष्यवृत्तीची थकबाकी देण्यात आली. यामुळे सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ मायनिंग अँड फ्युअल रीसर्च (धनबाद, नागपूर), राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी, नागपूर) आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल, पुणे) तसेच देशातील ‘सीएसआरआय’च्या इतर प्रयोगशाळांमधील संशोधक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. देशात ‘सीएसआयआर’च्या ३८ राष्ट्रीय प्रयोगशाळा आहेत. पंतप्रधान संस्थेचे अध्यक्ष आणि विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री उपाध्यक्ष आहेत. या प्रयोगशाळांमध्ये राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) आणि अभियांत्रिकीमध्ये पदवीधर कल चाचणी (गेट) उत्तीर्ण उमेदवारांना संशोधनाची संधी दिली जाते. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांना कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्ती (जेआरएफ) आणि वरिष्ठ संशोधन शिष्यवृत्ती (एसआरएफ) दिले जाते. या संशोधक विद्यार्थ्यांना काळानुरूप शिष्यवृत्ती आणि सहयोगवृत्ती वाढण्याची मागणी होती. त्यामुळे सर्व प्रयोगशाळा, संस्थांमधील नेट उत्तीर्ण संशोधक विद्यार्थ्यांना १ ऑक्टोबर २०१४ पासून वाढीव शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला. श्यामप्रसाद मुखर्जी शिष्यवृत्ती (एसपीएमएफ), नेहरू पीडीएफ तसेच जेआरएफ, एसआरएफ-नेटचा समावेश आहे. परंतु जेआरएफ-गेटच्या माध्यमातून आलेल्या संशोधक विद्यार्थ्यांना वाढीव शिष्यवृत्ती देण्यात येत नव्हती. यामुळे जेआरएफ-नेट आणि जेआरएफ-गेट यांच्या शिष्यवृत्तीत मोठी तफावत निर्माण झाली होती. मात्र एप्रिल महिन्यापासून सर्व विद्यार्थ्यांना थकबाकीसह वाढीव शिष्यवृत्ती देण्यात येऊ लागली आहे.

जेआरए-नेट, जेआरएफ-गेट समान

जेआरएफ-नेट विद्यार्थ्यांना पहिले दोन वर्षे १६ हजार आणि त्यानंतर १८ हजार रुपये शिष्यवृत्ती देण्यात येत होती. १ ऑक्टोबर २०१४ पासून ती अनुक्रमे २५ हजार आणि २८ हजार रुपये करण्यात आली. मात्र याबाबतीत जेआरएफ-गेट विद्यार्थ्यांवर अन्याय झाला होता. त्यांना पहिले दोन वर्षे १६ हजार आणि त्यानंतरचे दोन वर्षे १८ हजार शिष्यवृत्ती दिली जात होती. आता जेआरएफ-नेट आणि जेआरएफ-गेट माध्यमातून आलेल्या संशोधक विद्यार्थ्यांना एसआरएफ १८ हजारावरून २८ हजार आणि जेआरएफ १६ हजारांवरून २५ हजार करण्यात आली आहे.