सुट्टय़ा रद्द, रोज १२ तास काम; अविरत सेवेनंतरही ग्राहकांकडून शिवीगाळ, रोखपालांवर सर्वाधिक ताण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबरला पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या बदलवून घेण्यासाठी बँकेत ग्राहकांनी गर्दी केली. अचानक उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी बँकांना वेळही मिळाला नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा भार वाढला. दररोज बारा किंवा त्यापेक्षा अधिक काळ कर्मचारी राबत असून त्यात महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. सर्वाच्या सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, सर्व उपाययोजना करूनही ग्राहक समाधानी नसल्याने त्यांच्याकडून शिवीगाळ होत आहे. बँकांच्या रोखपालांवर सर्वाधिक ताण आहे.
सकाळी आठ वाजता बँकेत गेलेले कर्मचारी रात्री अकरा किंवा त्यानंतरच परततात. पहिल्या काही दिवसांत तर सर्वच बँकेतील कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास पहाट झाली होती. दुपारचा डबा खाण्याची वेळही बँकांनी कमी केली आहे. मुलांना दवाखान्यात नेता येत नाही. कौटुंबिक कार्यक्रमांसाठीही उपस्थित राहता येत नाही. नातेवाईकाचे निधन झाले तर तेथेसुद्धा जाता येत नाही, अशी वेळ आमच्यावर आल्याची प्रतिक्रिया बँक कर्मचाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
सर्वाधिक ताण रोखपालावर आहे. नवीन नोटा हाताळण्याची सवय नसल्याने अनेक वेळा त्या देताना जास्त दिल्या जातात व त्याचा भूर्दंड त्याच्यावर येतो. नोटांची तपासणी आणि नवीन नोटा देणे हे जोखमीचे काम आहे.
रोखपालांवर सर्वाधिक दडपण
सकाळी ९ ते रात्री ११ वाजेपर्यंत काम चालते. महिलांसह सर्व कर्मचारी पूर्ण वेळ हजर असतात. चौकशीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक आहे. इतर सर्व कामे थांबविली फक्त रोख काढणे व जमा करणे यावरच लक्ष केंद्रित करण्यात येते. लंच टाईममध्येही काम, रोखपालालावर नोटा तपासण्याचे सर्वाधिक दडपण, सर्वाच्या सुटय़ा रद्द करण्यात आल्या. कौटुंबिक कार्यक्रमांना, नातेवाईकांच्या निधनासाठीही जाणे अवघड जात आहे. लोकांची समजूत काढणे मोठे आव्हान आहे.
– विवेक बंगाले , व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया (मस्कासाथ शाखा).
ग्राहकांकडून पदोपदी अवमान
आठ दिवसांपासून १२ तास कर्मचारी काम करीत आहेत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मदत घेतली जात आहे. उपलब्ध कर्मचारी आणि सुविधांच्या जोरावर आम्ही ग्राहकांना चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र ग्राहक आमच्या अडचणी समजून घेत नाहीत. कोणी नेत्यांची धमकी देतो तर कोणी मनात येईल ते बोलतात. आम्हालाही मर्यादा आहेत. अनेक वेळा जेवण न करता कर्मचारी काम करीत आहेत. के. सदाशिव हे वरिष्ठ व्यवस्थापक पदावरून जूनमध्ये निवृत्त झाले. ते स्वत:हून सेवा देत आहेत. देशपांडे, तेलंग आणि पेठे या सेवानिवृत्त कर्मचारीही अशीच सेवा देत आहेत.
– सुनील अग्निहोत्री. वरिष्ठ शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, प्रतापनगर.
कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ा रद्द
सारस्वत बँकेच्या शहरात गांधीबाग, कळमना, छाप्रूनगर, प्रतापनगर आणि हिंगण्यासह सहा शाखा असून त्यात २० ते २५ हजार खातेधारक आहेत. केंद्राने नोटा बंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर अचानक उद्भवलेल्या परिस्थितीला कर्मचारी संयमाने तोंड देत आहेत. सर्व कर्मचाऱ्यांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. पूर्वीच मंजूर झालेल्या ‘एलटीसी’ही रद्द करण्यात आल्या आहे. महिला कर्मचाऱ्यांसह सर्व कर्मचारी दररोज बारा तासांपेक्षा जास्त काम करीत आहेत. पहिल्या दिवशी कर्मचाऱ्यांना घरी जाण्यासाठी पहाटेचे तीन वाजले. कामाच्या दगदगीमुळे काही कर्मचाऱ्यांचा रक्तदाबही वाढला. कामाचा ताणही वाढला आहे. पण कोणीही तक्रार न करता काम करीत आहेत.
– रेणुका वाचासुंदर, व्यवस्थापक, सारस्वत बँक, गांधीबाग शाखा
नियोजनामुळे मन:स्ताप कमी
उपलब्ध कर्मचाऱ्यांमध्येच योग्य नियोजन केल्याने कर्मचारी किंवा ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला नाही. रांगेतील ग्राहकांसाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती. पिण्याच्या पाण्याचीही सोय करण्यात आली होती. पहिल्या दिवशी बँकेत ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली, पण योग्य नियोजनामुळे गोंधळ उडाला नाही. रात्री उशिरापर्यंत जुन्या नोटा स्वीकारणे आणि बदलून देण्याची प्रक्रिया सुरू होती. आता मात्र लोकांची गर्दी ओसरली. पहिल्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांनी संध्याकाळी ७ वाजताच त्यांचा ‘टिफीन’ उघडला. दुसऱ्या दिवसापासून महिला कर्मचाऱ्यांना वेळेवर डबा खाता यावा म्हणून रोख काऊंटरवर कर्मचारी बदलण्यात येत होते.
– अभिजित जिभकाटे, शाखा व्यवस्थापक, एचडीएफसी शाखा, घाट रोड.
टपाल कार्यालयातही कामाचा ताण
बँकांप्रमाणेच टपाल कार्यालयही या आपत्कालीन स्थितीला तोंड देत असून कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत थांबवे लागते. एटीएम किंवा बँकांप्रमाणेच आमच्याकडेही रांगा असतात. थोडा मानसिक त्रास असला तरीही अद्याप इतर बँकांप्रमाणे पोलिसांना बोलवावे लागले नाही, ही जमेची बाजू आहे. आठ नोव्हेंबरच्या नोटाबंदीनंतर आमच्या सुरक्षितेसाठी आम्ही ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांचे क्रमांक प्रामुख्याने लिहून घेऊ लागलो. ग्राहकांना नक्कीच त्रास झाला, पण इलाज नव्हता. दिवसभर कर्मचारी काम करून पदरमोडही करतील काय? म्हणून नोटांचे क्रमांक लिहून घेत होतो. ‘फेक नोट डिटेक्टर मशीन’ तेव्हा नव्हती. ती मंगळवारी मिळाली आणि बुधवारी १६ नोव्हेंबरपासून नोटा मोजणी आणि बनावट नोटा तपासणी त्याद्वारे सुरू करण्यात आले. पहिल्या दिवशी एक ५०० आणि दुसरी १०००ची अशा दोनच बनावट नोटा निघाल्या. पोस्टात रोजचे दीड कोटी रुपये जमा होत आहेत. कारण बचत खात्याबरोबरच, पीपीएफ, आरडी आणि इतरही पोस्टाच्या योजना आहेत. रोज रात्री नऊ ते ११.३० पोस्टात वाजतात. बुधवारी तर रात्री दीड वाजेपर्यंत कामकाज सुरू होते. कुटुंबीयांना आवश्यकता असेल तेव्हाच फोन करण्याची ताकीद दिली आहे.
– महेंद्र ढेंगरे, पोस्ट मास्तर, हनुमाननगर
परिस्थितीला संयमाने तोंड
अचानक उद्भवलेली अशी स्थिती हाताळण्याचा अनुभव नव्हता. पण परिस्थितीला संयमाने तोंड दिल्याने काम सोपे झाले. सुटय़ा रद्द झाल्या, कामाचे तास वाढले तरीही आम्ही सारेच सहकारी या परिस्थितीत आनंदाने काम करीत आहोत. एक महिला म्हणून वेगळी वागणूक द्यावी असे कधीही वाटले नाही. हे काम आम्ही ‘एन्जॉय’ करत आहोत, असे म्हटले तरी चालेल. विशेष म्हणजे आमच्या बँकेत येणारा ग्राहकवर्गसुद्धा तेवढाच सहकार्य करत असल्यामुळे आठवडाभरात एकदाही वादावादी, आवाज वाढवण्याचा प्रकार घडून आला नाही.
– वसुधा धकाते, कर्मचारी, युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा खामला
ताण वाढला
जुन्या नोटा स्वीकारणे, नवीन नोटा देणे ही काळजीपूर्वक आणि थोडी वेळ घेणारी प्रक्रिया आहे. पण थोडासाही विलंब झाल्यास ग्राहकांचा रोष कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो. गर्दी वाढल्याने कामाचा ताणही वाढला. बँकेच्या एटीएममध्ये आम्ही दिवसातून दोन वेळा रोकड भरतो. मात्र, दोनतासात ती संपल्याने पुन्हा बँकेत गर्दी वाढते. कमी मनुष्यबळाच्या आधारावर आम्ही ग्राहकांना सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहोत.
– ए. शिव सत्य नारायण , सहाय्यक महाव्यवस्थापक, यूको बँक अजनी.
फक्त आंघोळीसाठीच कर्मचारी घरी
केंद्राने अचानक निर्णय घेतल्याने ग्राहक आणि कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण होऊन ग्राहकांसोबत वादही झाले. पहिले सहा दिवस कर्मचाऱ्यांना फक्त आंघोळीसाठीच घरी जाता आले. त्यात व्यवस्थापकांसह काही कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली.आताही गर्दी कमी न झाल्याने कर्मचाऱ्यांना चोवीस तास काम करावेच लागते आहे.
– प्रकाश करांगळे , व्यवस्थापक (प्रभारी) शिक्षक सहकारी बँक, नंदनवन
जुन्या नोटा तपासण्याचे आव्हान
नोटा बदलण्यासाठी बँकेत गर्दी आहे, त्याची तपासणी, त्याची नोंद करणे, ओळखपत्र तपासणे या सर्व प्रक्रिया पूर्ण करायला वेळ लागतो. एकदा नोटा बदलून गेलेली व्यक्ती पुन्हा वेगळे ओळखपत्र घेऊन आल्यास तिला थांबविण्याची कोणतीही यंत्रणा नाही, त्यामुळे रोखपालावर दडपण आले आहे.
– बँक कर्मचारी, स्टेट बँक ऑफ इंडिया.
ग्राहक संख्येत दहापट वाढ
खासगी बँकेत कर्मचाऱ्यांची संख्या मुळातच कमी आहे. एका शाखेत साधारणपणे दररोज २०० ते २५० ग्राहक येतात. सध्या ही स्थिती
दहापटीने वाढली, त्यामुळे व्यवस्था कोलमडली, सध्या सर्व कर्मचारी १६ तासांपेक्षा जास्त काम करीत आहेत, गर्दीमुळे अवकाश काळही कमी करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांसाठी ही स्थिती आपत्कालीन असली तरी यातून अनेक गोष्टी त्यांना शिकायलाही मिळत आहे. नोटा बदलण्यासाठी रिझव्र्ह बँकेने काही नियमावली तयार केली असली तरी प्रसंग पाहून ग्राहकहिताला प्राधान्य द्यावे लागते.
– कर्मचारी, इंन्डसइन्ड बँक