प्लॅस्टिकच्या कचऱ्यात वाढ

बाटलीबंद पाण्याचा वाढता वापर नागरिकांच्या आरोग्यावर परिणामकारक ठरत असल्याचे अलीकडेच एका चाचणीत निदर्शनास आले. त्याचवेळी बाटलीबंद पाण्याच्या अर्निबध वापरामुळे होणाऱ्या प्लॅस्टिकच्या कचऱ्यातही वाढ झाली आहे. या दोन्ही गोष्टी लक्षात घेता केंद्राने अलीकडेच सरकारी कार्यक्रमातील बाटलीबंद पाण्याच्या वापरावर र्निबध आणले आहेत. बाटलीबंद पाण्याच्या वापराचे दुहेरी दुष्परिणाम लक्षात घेता सरकारी कार्यकमातील याचा वापर खरोखरंच रोखला जाईल का? याबाबत शंका आहे.

भाभा अनुसंधान केंद्र आणि विज्ञान व पर्यावरण केंद्राने केलेल्या संयुक्त चाचणीत ‘ब्रोमेट’ हे कर्करोगयुक्त रसायन आणि कीटकनाशक बाटलीबंद पाण्यात आढळले. बाटलीबंद पाण्याच्या युगात नळ आणि विहिरीच्या पाण्याला दुय्यम दर्जा दिला जात असताना हेच बाटलीबंद पाणी माणसाच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरले आहे. प्रदूषणामुळे घरगुती पिण्याचे पाणी प्रदूषित झाले असताना बाटलीबंद पाण्यातही हे रसायन आढळल्याने पिण्याच्या पाण्यासंदर्भात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तरीही लोकांचा या पाण्याकडचा कल कमी झाला नाही. त्यामुळेच बाटलीबंद पिण्याच्यापाण्याचे बेकायदेशीर उद्योग सुरू झाले आहे. हे उद्योग पर्यावरणासाठी अधिक घातक ठरत चालले आहेत. बाटलीबंद पाण्याचा वापर प्रचंड वाढल्यामुळे प्लॅस्टिक कचऱ्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. देशाच्या राजधानीतच बाटलीबंद पिण्याच्या पाण्याचे सुमारे दहा हजार अवैध कारखाने आहेत. तर संपूर्ण देशात तीन लाखाहून अधिक कारखाने आहेत. अलीकडे सर्वसामान्य माणूससुद्धा जवळ घरची पाण्याची बॉटल बाळगण्याऐवजी बाहेरुन पाण्याची बॉटल विकत घेणे अधिक पसंत करतो. हॉटेलमध्येही साधे पाणी उपलब्ध असताना बाटलीबंद पाण्याकडेच लोकांचा कल असतो. पाणी पिल्यानंतर या बॉटल्स तशाच पडून राहतात. अशा लाखो बॉटल्सचा खच दररोज तयार होतो आणि पर्यावरणासाठी प्लॅस्टिक हे सर्वाधिक धोकादायक आहे.

केंद्र सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने येत्या २ ऑक्टोबर २०१९ महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीपर्यंत स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत देशभरात सर्व ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. त्याअंतर्गत पाण्याचे आरोग्यावरील दुष्परिणाम व होणारा कचरा या दोन्हीच्या परिणामामुळे सरकारी कार्यक्रमात बाटलीबंद पाण्याच्या वापरसाठी र्निबध घातले आहे. काही राज्यांमध्ये आधीपासूनच हे र्निबध घातल्या गेले आहेत. बैठका, चर्चासत्र, परिषदा, कार्यशाळा यात बाटलीबंद पाणी वापरू नये, असेही या आदेशात म्हटले आहे. मात्र, साध्या पाण्याकडे पाठ फिरवून प्रतिष्ठेचे लक्षण झालेल्या बाटलीबंद पाण्याकडे सरकारी अधिकारी दुर्लक्ष करतील का, याबद्दल मात्र शंका व्यक्त केली जात आहे.