अनेक अधिकारी परस्पर बदली रद्द करण्याच्या प्रयत्नात

राज्यभरात सध्या बदलीचे वारे वाहात आहेत. बदलीचा हंगाम म्हणजे राज्य सरकारसाठी सुगीचा हंगाम असतो. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. मात्र, त्याऊलट परिस्थिती मुख्यमंत्र्यांच्या गृहशहरातील पोलीस अधिकारी आज अनुभवत आहेत. शहर पोलीस दलात अधिकाऱ्यांची चणचण भासत असतानाही बदली झालेले अधिकारी रुजू न होता परस्पर बदली रद्द करण्याच्या प्रयत्नात आहेत. अशा मुजोर अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याचे मोठे आव्हान मुख्यमंत्री आणि गृह खात्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आहे.

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीमध्ये घोडेबाजार चालत असल्याचे सर्वज्ञात आहे. या घोडेबाजारात भाग न घेणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्यांवर मात्र नेहमीच अन्याय होतो. त्यांना या ठिकाणाहून त्या ठिकाणी बदलले जाते. त्यांची कौटुंबिक परिस्थिती, आरोग्य आदींचा विचार करण्यात येत नाही. परंतु घोडेबाजारात तेजी आणणाऱ्या अधिकाऱ्यांची इच्छित ठिकाणी बदली करण्यात येते. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामठी, जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हस्तांतरण कार्यक्रमात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीत राजकीय हस्तक्षेप होणार नाही.

त्यांचे काम बघूनच बदली करण्यात येईल. परंतु काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षकांच्या बदली यादीवरून पोलीस दलात नाराजीचे सूर उमटले. दोन-चार महिन्यांपूर्वी नागपुरात रुजू झालेल्या काही अधिकाऱ्यांची पुन्हा बदली करण्यात आली. तर अनेक वर्षांपासून परिवारापासून दूर राहून नागपुरात सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अर्जाना सरकारने केराची टोपली दाखविली. त्यामुळे आघाडी सरकारच्या पावलावर पाऊल ठेवूनच भाजप सरकारचा कारभार सुरू असल्याची टीका पोलीस वर्तुळातूनच होत आहे.

उपायुक्तांकडूनही बदली रद्दचे प्रयत्न

११ मे रोजी गृह विभागाने पोलीस उपायुक्त, पोलीस अधीक्षक आणि तत्सम अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात परिमंडळ दोनच्या उपायुक्तपदी औरंगाबादचे पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांची बदली करण्यात आली. तर ठाणे शहराचे पोलीस उपायुक्त सचिन पाटील यांच्याकडे नागपुरात विशेष शाखा आणि मुंबईच्या सायबर सेलचे पोलीस उपायुक्त राजकुमार यांची बदली शहर पोलीस उपायुक्त करण्यात आली. यातील काही अधिकारी नागपुरात येण्यास तयार नाहीत. त्यामुळे ते राजकीय वशीला लावून बदली रद्द करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे नागपुरात कार्यरत अधिकाऱ्यांना अतिरिक्त कामाचा ताण आहे.

सहाय्यक पोलीस आयुक्तांचेही तेच रडगाणे

नागपुरातील अनेक सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे अतिरिक्त प्रभार आहे. नागपूरचे सहाय्यक पोलीस आयुक्त मच्छींद्र बाबुराव चव्हाण यांची बदली लोहमार्ग पोलीस मुंबई येथे करण्यात आली. जळगावच्या फैजपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी योगेश चव्हाण यांची बदली नागपुरात सहाय्यक पोलीस आयुक्तपदी करण्यात आली. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्य़ातील मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी बाबुराव भाऊसाहेब महामुनी, ब्रम्हपुरी येथील रीना यादवरावजी जनबंधू आणि परभणी जिल्ह्य़ातील जिंतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर मोहन काळे यांची बदली नागपुरात सहाय्यक पोलीस आयुक्तपदी करण्यात आली. यातील कितीजण नागपुरात रुजू होतात, हे पाहण्यासारखे ठरेल, अशीही चर्चा पोलीस वर्तुळात रंगली आहे.

तर कारवाई करू

पोलीस अधिकाऱ्यांची बदली ही त्यांच्या इच्छेनुसार होणार नाही. बदलीच्या ठिकाणी त्यांना रूजूच व्हावे लागेल. रूजू न होणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.

– डॉ. रणजीत पाटील,  गृहराज्यमंत्री