ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे स्पष्टीकरण; मुंबईत आज बैठक

महावितरणने ग्राहकांना टाळेबंदी काळातील वीज देयक तीन हप्त्यात भरण्याची मुभा दिली. शिवाय या काळात  दंड व व्याज आकार माफ करून एकाचवेळी देयक भरणाऱ्यांना २ टक्के सवलतीचा निर्णय घेतला. त्याच धर्तीवर मुंबईच्या अदानी, टाटा, बेस्टच्या वीज ग्राहकांनाही हा लाभ मिळवून देणार आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

नागपूरच्या लोकसत्ता कार्यालयाला सोमवारी सदिच्छा भेट दिली . राऊत म्हणाले, टाळेबंदीमुळे सर्व लोक घरातच होते. शिवाय उन्हाळा असल्याने  वीज वापर जास्त होऊन वीज देयक जास्त आले. ते एकाचवेळी भरायला जड जात असल्याने महावितरणला आदेश देऊन तीन हप्त्यात देयक भरणाऱ्यांचे व्याज व दंड माफ केले. एकाचवेळी देयक भरणाऱ्यांना २ टक्के सवलत दिली. त्यात महावितरणने मोठा आर्थिक फटका सहन केला.

मुंबईच्या वेगवेगळ्या भागात वीज पुरवठा करणाऱ्या अदानी, रिलायन्स, टाटा या खासगी कंपन्यांना वीज नियामक आयोगाने मंजुरी दिली आहे. या खासगी कंपन्यांवर शासनाचे नियंत्रण नाही. मुंबईच्या वीज ग्राहकांना ही सवलत नव्हती. त्यामुळे शासन म्हणून या प्रकरणात हस्तक्षेप करून तेथील ग्राहकांनाही महावितरणच्या धर्तीवर ही सवलत दिली जाईल. या विषयावर मुंबईत मंगळवारी लोकप्रतिनिधींची बैठक आहे. केंद्राला १० हजार कोटी रुपयांची मदत मागितली असून ती मिळाल्यावर टाळेबंदीकाळातील वीज देयकात मोठी सवलत देणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले