कारवाईची पर्वा न करता नफ्याला प्राधान्य

पर्यावरणासाठी धोकादायक ठरणाऱ्या थर्माकोलवर बंदी असतानाही गणपतीची मूर्ती घडवताना सर्रास थर्माकोल वापरले जात आहे. यावर्षीपासून प्लास्टिक व थर्माकोलवर कारवाईचा बडगा उभारल्यानंतर अनेक मूर्तीकारांकडे गेल्यावर्षीचा थर्माकोलचा साठा तसाच पडलेला होता. तो साठा आता अशा पद्धतीने कामात आणला जात आहे. विशेष म्हणजे, काही मूर्तीकार कारवाईची पर्वा न करता नफ्याला प्राधान्य देत आहेत.

प्लास्टिकबंदीचा बडगा संपूर्ण राज्यात उभारल्यानंतर त्यात थर्माकोलचा देखील समावेश करण्यात आला. गणेशोत्सव असो किंवा देवींचा उत्सव. त्यांच्या सजावटीत थर्माकोलचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो, परंतु बंदीमुळे मूर्तीकारांची मोठी अडचण झाली होती. काही मूर्तीकारांच्या मते, यावर्षी गणेशमूर्तीच्या व्यवसायात फार फरक पडलेला नाही. मंडळांच्या मान्यतेचे नियम मात्र कडक करण्यात आले आहे. साधारणपणे दहा फुटाच्या आतच गणेश मूर्ती तयार होत आहेत. याशिवाय मूर्तीमध्ये वैविध्य असेल तर त्यांच्या किंमतींमध्ये वाढ होते. रंगांच्या किमतीचा फारसा फरक पडलेला नाही. कारण रंग गेल्यावर्षीसुद्धा महागच होते. गणेशमूर्तीना मागणी मात्र साधारणच असल्याचे एका मूर्तीकाराने सांगितले. काही मूर्तीकांरानी कारवाईच्या भीतीमुळे ‘रबरशीट’महाग पडत असतानासुद्धा थर्माकोलला पर्याय म्हणून त्याचा वापर सुरू केला आहे. परिणामी मूर्तीच्या किमती वाढल्या आहेत.

प्लास्टिक बंदीचा फटका बसलाय

पीओपींच्या मूर्ती बाजारात येत असल्या तरीही आमच्याकडे मातीच्याच मूर्ती तयार होतात. यावर्षी देखील आमच्याकडे तयार होणाऱ्या सर्व गणेश मूर्ती या मातीच्याच आहेत. प्लास्टिक बंदीचा फटका मात्र बसला आहे. या बंदीत थर्माकोलही असल्याने गेल्यावर्षीचा खूप मोठा साठा शिल्लक आहे. ‘रबरशीट’ हा थर्माकोलचा पर्याय आहे, पण ती खूप महाग पडते. मात्र, कारवाईचा बडगा केव्हाही उभारला जाऊ शकतो. त्यामुळे आम्ही ‘रबरशीट’चाच वापर करत आहोत. त्याचाच वापर करून कमानी बनवल्या आहेत, असे मूर्तीकार राकेश पथराबे याने सांगितले.