तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात बुलेट ट्रेन प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. त्यामुळे सरकार बदलल्यावर टीका करण्याऐवजी मनमोहन सिंग यांना धन्यवाद द्या, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना गप्प बसवले.

विधान परिषदेत संजय दत्त यांनी यावर लक्षवेधी उपस्थित केली होती. मनमोहन सिंग यांनी देशात इतका महत्त्वाचा प्रकल्प आणला. त्यांच्या भेटीत जपानचे पंतप्रधान अ‍ॅबे यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाकरिता मान्यता घेण्यात आली. या सरकारने केवळ हा प्रकल्प समोर नेण्याचे काम केले. मनमोहन सिंग विचारपूर्वकच काम करीत होते. म्हणूनच राजकारण न करता या प्रकल्पाकरिता सर्वानी समर्थन द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

बुलेट ट्रेन प्रकल्पातील राजकीय आविर्भाव बाजूला ठेवून देशाच्या विकासात साथ द्या. तुम्हाला प्रकल्प पटला, पण वरील दबावामुळे गेल्या चार वर्षांपासून तुम्ही हाच प्रश्न विचारत आहात, असा टोलाही त्यांनी संजय दत्त यांना हाणला.

प्रकल्पासाठी जमिनी लागतात, ते हवेत होत नाहीत. आम्ही ग्रामस्थांच्या जमिनी घेताना कुणालाही जबरदस्ती केली नाही. ग्रामस्थांशी चर्चा करून व जनसुनावणीनंतरच जमिनी घेतल्या जात आहेत असे त्यांनी सांगितले. केंद्राकडून त्यासाठी ५५ हजार कोटी रुपये बजेटमधून देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.