News Flash

चौकशी कोणाची करणार ?

पवारांची भूमिका सत्यापासून दूर जाणारी - फडणवीस

पवारांची भूमिका सत्यापासून दूर जाणारी – फडणवीस

नागपूर : राज्याचे तत्कालीन पोलीस महासंचालक परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी माजी पोलीस महासंचालकाकडे देण्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सूचना केली. मात्र चौकशी केवळ वाझे यांची होणार की गृहमंत्र्यांची? याबाबत मात्र पवारांनी स्पष्ट भूमिका घेतली नाही. पवार महाविकास आघाडीचे निर्माते असल्यामुळे त्यांची भूमिका सत्यापासून दूर जाणारी असल्याची अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

या प्रकरणाची चौकशी ज्युलियो रिबेरो यांच्याकडे द्यावी, अशी सूचना पवार यांनी माध्यमांशी बोलताना केली. मात्र चौकशी परमबीर सिंग यांची की या संपूर्ण प्रकरणाची, याबाबत त्यांनी  स्पष्ट भूमिका मांडली नाही. जर गृहमंत्र्यांची चौकशी करायची असेल तर दहा-पंधरा वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झालेला एक अधिकारी ती करू शकतो का? त्यांना ते अधिकार आहेत का? आणि ते निष्पक्ष चौकशी करू शकतील का?  गृहमंत्र्यांना आणि सरकारला वाचवण्याचे पूर्ण प्रयत्न पवार करीत आहे.

परमवीर सिंग यांनी पाठवलेले हे काही पहिले पत्र नाही. रश्मी शुक्ला यांच्या तपासानंतर तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी जो अहवाल सरकारकडे सादर केला, त्याची माहिती जनतेला द्या, म्हणजे संपूर्ण प्रकार उघडकीस येईल, असा आरोप फडणवीस यांनी या वेळी केला. जयस्वाल यांनी एक अहवाल राज्य सरकारला सादर केला होता. तेव्हाच्या आयुक्त, गुप्तवार्ता यांच्याकडून हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला होता आणि त्यांच्याकडून तो गृहमंत्र्यांकडे गेला होता याकडे त्यांनी लक्ष वेधले.

सुबोध जयस्वाल यांनी पोलीस महासंचालकासारखे प्रतिष्ठेचे पद सोडण्याचे काहीच कारण नव्हते, पण रश्मी शुक्ला यांनी दिलेल्या अहवालावर हे सरकार कोणतीही कारवाई करू इच्छित नव्हते आणि नेमक्या त्या दूरध्वनी संवादातीलच नावे बदल्यांच्या फाइलमध्ये आलेली होती. भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करण्याबाबत शासन अजिबात गंभीर नव्हते. त्यामुळे ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले.

परमबीर सिंग यांच्या अध्यक्षतेतील कमिटीने वाझे यांना नोकरीत घेतले, असे शरद पवार सांगत असले तरी मुख्यमंत्र्यांच्या तसेच गृहमंत्र्यांच्या निर्देशाने, आशीर्वादाने त्यांनी हे काम केले, हे सांगायला मात्र पवार विसरले. खरे तर गृहखाते कोण चालवते? अनिल देशमुख की अनिल परब, हाच प्रश्न निर्माण झाला आहे. सचिन वाझे जितक्या गाडय़ा वापरत होते, त्यापैकी काही गाडय़ा गेल्या पाच ते सहा महिन्यांत नेमके कोण कोण व्यक्ती वापरत होते, हेही स्पष्ट झाले पाहिजे.

‘राज यांची भूमिका योग्य’

या प्रकरणाची चौकशी केंद्र सरकारने केल्यास अनेक फटाके वाजतील. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी निष्पक्ष व नीट झालीच पाहिजे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली असून ती योग्य आहे. सामान्यपणे अशा प्रकरणाची चौकशी केंद्रीय संस्था करतात, मात्र मी तशी मागणी केली तर कांगावा केला जाईल म्हणून कोर्ट मॉनिटर चौकशी करण्याची  मागणी केली आहे. न्यायालयाने या चौकशीवर लक्ष ठेवावे, असेही फडणवीस म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2021 12:17 am

Web Title: devendra fadnavis slams sharad pawar over anil deshmukh issue zws 70
Next Stories
1 दत्तात्रेय होसबाळे नवे सरकार्यवाह
2 वर्धेतील महिलेत आढळलेला विषाणूचा स्ट्रेन ‘ब्रिटन’चा!
3 … एका वाघाची भ्रमणगाथा
Just Now!
X