काही ढोंगी लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मोर्चासंदर्भात ते बोलत होते.

भंडाऱ्यातील भाजपच्या मोर्चात सहभागी झाल्यानंतर त्यांनी वृत्तवाहिन्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, कृषी कायद्यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार देऊ पाहत आहेत. मात्र, काही ढोंगी लोक या शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत.  मुंबईत आझाद मैदानातील मोर्चा हा आदिवासींचा होता. मात्र, काहीजण त्या मोर्चाला शेतकरी मोर्चा सांगून दिशाभूल करण्याचे प्रयत्न करीत आहेत. ‘वाहत्या गंगेत हात धुण्यासारखा’ हा  प्रकार आहे. तो यशस्वी होणार नाही.

भेंडीबाजारातील महिला शेतकरी कशा? -दरेकर

मुंबई : कृषी कायद्याविरोधात मुंबईत शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात  शेतकरी कमी आणि घुसवलेले लोक जास्त होते. भेंडीबाजारातील महिला शेतकरी कधीपासून झाल्या, असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला. ज्या महिला आझाद मैदानावर उपस्थित होत्या, त्या महिला भेंडीबाजारातील होत्या. मग त्या महिला आजच्या मोर्चात सहभागी कशा झाल्या, असा सवाल दरेकर यांनी केला.