महापालिका करणार लिलाव

जमिनीला सोन्याची किंमत आली असताना आणि इंचभर जमिनीसाठी वाद-विवाद होत असताना शहरातील तब्बल सव्वा लाख भूखंडाचे मालक महापालिकेला सापडत नाही. त्यामुळे या सर्व भूखंडाचा  लिलाव करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

मालमत्ता कराची वसुली करण्यासाठी शहरात विविध भागातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात अनेक खुले भूखंडही आहे. त्यावर कर आकारणीसाठी महापालिका भूखंड मालकांचा शोध घेत आहे. महापालिकेत याबाबत कुठेही नोंद नाही. त्यामुळे सहा महिन्यापूर्वी  सर्व भूखंडावर महापालिकेने त्यांचे फलक लावले. मात्र, यानंतरही त्यावर हक्क सांगण्यासाठी पुढे आले नाही.  त्यामुळे भूखंडाचा लिलाव करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यानंतर तरी भूखंड मालक पुढे येऊन कर भरतील अशी अपेक्षा प्रशासनाला आहे. यंदा मालमत्ता कर वसुलीचे . ५०९ कोटीचे लक्ष्य होते.  आतापर्यंत केवळ १५७ कोटी रुपये महापालिकेकडे मालमत्ता कर जमा झाला आहे, हे येथे उल्लेखनीय.

दरम्यान व्हीआरसी , एनएडीटी, मानकापूर स्टेडियम, पोलीस विभाग, आयनॉक्स, सेंट्रल मॉलकडून थकित कर वसुली केली जाणार आहे. त्यांना पत्र देण्यात आले, असे स्थायी समितीचे अध्यक्ष कुकरेजा यांनी सांगितले. न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे कोटय़वधी रुपयाचा महसूल महापालिकेला मिळत नाही. अशा  प्रकरणासाठी  विधि सेल स्थापन करून संबंधित मालमत्तांवर जेवढा कर आहे त्यांच्या अर्धा कर मिळावा, यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.त्या दृष्टीने विधी सेल लवकरच आराखडा तयार करणार असल्याचे कुकरेजा यांनी सांगितले.

शहरातील खुल्या भूखंडांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. त्यांची यादी महापालिकेकडे नसल्यामुळे त्या सर्वावर कर आकारला जात  नव्हता. याचे मालक कोण याचा शोध घेण्यात आला. मात्र अद्याप  कुणीही समोर आले नाही. त्यामुळे अशा भूखंडाचा लिलाव करण्यात येणार आहे.’

– वीरेंद्र कुकरेजा, स्थायी समिती अध्यक्ष