दुसरा आठवडा कायदा व सुव्यवस्थेवर गाजणार

बहुचर्चित गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या सोमवारी जाहीर होणार असून ते कोणाच्या बाजूने जाणार यावरच राज्य विधिमंडळ अधिवशनाच्या दुसऱ्या आठवडय़ातील कामकाजाचा कल ठरणार आहे. दरम्यान पहिला आठवडा शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि बोंडअळीच्या मुद्यावरून गाजवल्यानंतर विरोधक दुसऱ्या आठवडय़ात कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तसे संकेत दिले आहेत.

गुजरात निवडणुकीत सत्ताधारी भाजपची  प्रतिष्ठा दावणीला लागली आहे, तसेच काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठीही विशेषत: नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्त्वा प्रस्थापित करण्यासाठी हा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे, सोमवारी सकाळपासून निकालाचे कल येणे सुरू होतील, ते भाजपच्याबाजूने गेले तर सत्ताधारी आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि विरोधात गेले तर काँग्रेस-राष्ट्रवादीला सरकारविरोधात आक्रमक होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या निकालावरच विधिमंडळाच्या दुसऱ्या सत्रातील कामकाजाचे भवितव्य ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान  कुठलीही तयारी न करता केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेमुळे सरकारची चांगलीच पंचाईत झाली आहे. रोज नव्या चुका उघडकीस येत आहेत. अपेक्षेप्रमाणे हा मुद्दा विरोधकांनी पहिल्या आठवडय़ात लावून धरला. विरोधकांचा ‘जनाक्रोश-हल्लाबोल’ मोर्चा यशस्वी झाल्याने त्यांनी नंतरही दोन दिवस सरकारला धारेवर धरले. सरकारकडून विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिषदेत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विरोधकांची धार कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांना अपेक्षित यश आले नाही. कारण उत्तरात नाविन्य नव्हते. उद्या सोमवारपासून अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या आठवडय़ाच्या कामकाजाला सुरुवात होणार असून यात राज्यातील आणि विशेषत: नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरील चर्चा वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधकांनी कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न चालवले आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुन्ना यादवमुळे खुद्द मुख्यमंत्री अडचणीत सापडले आहेत. यादव यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून सध्या ते फरार आहेत. विरोधकांनी या मुद्यांवरून थेट मुख्यमंत्र्यांवरच शरसंधान केले आहे. यादव यांचा ठावठिकाणी शोधण्यासाठी पोलिसांनी मुख्यमंत्र्यांचा मोबाईल फोन तपासावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली होती. आपण मुंडे  यांच्याकडे फोन देण्यास तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनीही सांगितले होते. यावर या आठवडय़ात कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दुसऱ्या आठवडय़ात कायदा व सुव्यवस्थेसह विदर्भ आणि मराठवाडय़ातील प्रश्न लावून धरले जातील, असे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कळविले आहे.

पहिल्या आठवडय़ात बोंडअळीमुळे झालेली पीक हानी आणि कर्जमाफीचे मुद्दे आम्ही लावून धरले. मात्र, सरकारकडून ठोस आश्वासन मिळाले नाही. दुसऱ्या आठवडय़ात कायदा व सुव्यवस्था तसेच विविध घोटाळे उघड करू.

-धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिष