आयुक्तांची पालकमंत्र्यांना माहिती

नागपूर :  महापालिका आणि जिल्हा प्रशासनाद्वारे संयुक्तरित्या संचालित केंद्रीय नियंत्रण कक्षाचे निरीक्षण सोमवारी पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी के ले. यावेळी नियंत्रण कक्षातून पाठविण्यात आलेल्या कोणत्याही रुग्णाना दाखल करण्यास रुग्णालयाला नकार देता येणार नाही, असे आयुक्तांनी पालकमंत्र्यांना सांगितले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार करोना नियंत्रण कक्ष छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या सहाव्या माळ्यावर सुरू करण्यात आला आहे. करोना रुग्णांसाठी विविध कोविड रुग्णालयांमध्ये खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी  ही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच विविध कोविड रुग्णालयांमध्ये रेमडेसिविर, ऑक्सिजन पुरवठ्याकरिता देखील वेगळा नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आला आहे.

हा नियंत्रण कक्ष २४ तास सुरू आहे. येथे आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात तीन शिफ्टमध्ये तज्ज्ञांची चमू उपलब्ध आहे. आता कोणत्याही शासकीय रुग्णालयात तसेच खासगी रुग्णालयात (८० टक्के  क्षमतेत) अतितातडीचे रुग्ण वगळून थेट रुग्णाला दाखल करता येणार नाही. कंट्रोल रुममधून बेड अलॉट झाल्यानंतरच रुग्णाला दाखल करता येईल. शिवाय नियंत्रण कक्षातून पाठवण्यात आलेल्या कोणत्याही रुग्णाला दाखल करण्यास रुग्णालयाला नकार देता येणार नाही.

नियंत्रण कक्षातून बेडच्या उपलब्धेसंदर्भात सातत्याने माहिती घेतली जाते. फोनच्या माध्यमातून नियंत्रण कक्षाशी संपर्क साधत आहेत. रुग्णांची माहिती दिल्यानंतर रुग्णाची प्राणवायू पातळी, एचआरसीटी, आरटीपीसीआर रिपोर्ट या क्रमांकावर व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवता येईल.

यानंतर सॉफ्टवेअरच्या मदतीने लवकरात-लवकर रुग्णालयात उपलब्धतेनुसार बेड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत  आहेत. संबंधित रुग्णालयालाही याबाबत पूर्वसूचना दिली जात  आहे, अशी माहिती यावेळी महापालिका आयुक्तांनी पालकमंत्र्यांना दिली.