25 February 2021

News Flash

जपानी गार्डनमधील झाडांना चुकीची नावे!

वनखात्याची वक्रदृष्टी पडल्याने अनेकांनी त्याकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे.

वनखाते व महापालिकेच्या असमन्वयाचा फटका

वनखात्याच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावरील सेमिनरी हिल्सचे आकर्षण असलेल्या जपानी गार्डनचे वैभव केवळ वनाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे लोप पावले आहे. गेल्या काही वर्षांपासून येथील रोपवाटिकेतील पाणी पुरवठय़ासंदर्भात महानगरपालिका आणि वनखाते यातील असमन्वय त्यासाठी कारणीभूत ठरला असून, आता येथील उरल्यासुरल्या झाडांनाही चुकीची नावे देण्याचा प्रकार येथे निदर्शनास आला आहे.

सेमिनरी हिल्सवरील जपानी गार्डन, बालोद्यान, रोपवाटिकेसाठी वनखात्याने नियुक्त केलेले वनमजूर वनाधिकाऱ्यांच्या दिमतीला असण्याचा विषय वर्षभरापूर्वी प्रचंड गाजला होता. वनमजूरच नसल्याने त्याचा परिणाम जपानी गार्डन, बालोद्यान व रोपवाटिकेच्या देखभालीवर झाला. निसर्गप्रेमींच्या तक्रारीनंतर दीड वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्चून येथील बालोद्यानाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न झाला आणि काही शोभेची वृक्षही लावण्यात आली, पण पाण्याअभावी हा खर्च वाया गेला. त्याचवेळी वनखात्याची ही कार्यपद्धती प्रश्नांकित झाली. कधीकाळी येथील जपानी गार्डन म्हणजे निसर्गप्रेमींसाठी मोठी पर्वणी होती, कारण पक्ष्यांचा किलबिलाटही येथे ऐकू येत होता. पावसाळ्यात या उद्यानाचे सौंदर्य अधिकच खुलत होते. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी फिरायला येणाऱ्यांसाठी निसर्गाच्या सानिध्यातील ते एक ठिकाण होते, आता त्यावरही वनखात्याची वक्रदृष्टी पडल्याने अनेकांनी त्याकडे पाठ फिरवण्यास सुरुवात केली आहे.

नागपूर शहराला देशातील पहिल्या क्रमांकाचे हिरवे शहर करण्याचा प्रयत्न होत असताना, त्या हिरवळीचा गाभा असलेल्या सेमिनरी हिल्सवर वनखात्याच्या दुर्लक्षितपणामुळे कोरडे होण्याची वेळ आली आहे. महानगरपालिकेची पाण्याची वाहिनी याच उद्यानातून गेल्याने पाणीपुरवठय़ासाठी वेगळी व्यवस्था करण्याची गरज पडली नाही. सोबतच महापालिकेने एक बोअरवेलसुद्धा खोदून दिली. मात्र, कोटय़ावधी रुपयाचे पाण्याचे बिल न भरण्याचा प्रकार वनखात्याकडून २००६ पासून घडला आहे. त्याचा फटका जपानी गार्डनमधील गुलाबांच्या उद्यानाला बसला. गुलाब उद्यानातील नानाविध प्रकारचे गुलाब इथले आकर्षण होते, पण पाण्याअभावी ते गेल्या कित्येक वर्षांपासून सुकले आहे. अलीकडेच हिवाळी अधिवेशनादरम्यान लाखो रुपयांचे पाण्याचे बिल थकित असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावेळी वनमंत्र्यांच्या आदेशामुळे संबंधित वनाधिकाऱ्यांनी ते बिल भरले. गार्डनच्या सभोवताल सुशोभित लोखंडी शिल्प जपानी गार्डनची खरी ओळख होते, ती ओळखही पुसट झाली आहे. पाण्याअभावी झाडे सुकल्याने हिरवळ व प्रसन्न वातावरण लोप पावले आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी सभोवतालच्या बांबू रांजीवरही वनखात्याने कुऱ्हाड चालवल्यामुळे काही वर्षांपूर्वी पर्यटकांसाठी आकर्षण असलेले जपानी गार्डन आता केवळ नावापुरतेच उरले आहे.

विशेष म्हणजे मोठमोठय़ा झाडांनाही चुकीचे नाव देण्याचा प्रकार याच उद्यानात घडून आला आहे. निसर्गत: मिळालेले वैभव टिकवून न ठेवता आता याठिकाणी कृत्रिम उद्यान उभारण्याचा घाटही वनखात्याकडून घातला जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2016 4:09 am

Web Title: japanese garden nagpur trees name issue
Next Stories
1 लोकजागर : भ्रष्टाचारालाही प्रतिष्ठा..?
2 अनुदान वाटपातील आयुक्त कार्यालयाचा अडथळा दूर
3 रायमूलकरांच्या अपात्रतेसंदर्भात निवडणूक आयोगाचे मत पडताळणार
Just Now!
X