राज्य सरकारचे उच्च न्यायालयात शपथपत्र
‘न्यायिक अधिकारी प्रशिक्षण संस्था’ (जोती) येथे यंदापासून नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (एनएलयु) सुरू करण्यात येणार असून, विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था सीताबर्डीतील आयएएस प्रशिक्षण केंद्राच्या वसतिगृहात करण्यात येईल, असे शपथपत्र राज्य सरकारने आज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केले.

दोन वर्षांपूर्वी केंद्र सरकारने महाराष्ट्रात नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीची घोषणा केली, परंतु हे विद्यापीठ कुठे स्थापन करावे, यावरून रस्सीखेच सुरू झाली. त्यानंतर राज्य सरकारने मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद येथे विधि विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला. विधि विद्यापीठाच्या नंतर घोषणा करण्यात आलेल्या आयआयएम, आयआयआयटी आणि एम्सकरिता राज्य सरकार मिहानमध्ये जागा देत आहे, परंतु विधि विद्यापीठाकरिता केवळ ११ एकर जागेची तरतूद करण्यात येत आहे. शिवाय, विधि विद्यापीठाचे सत्र केव्हा सुरू होणार, हे अधांतरीच आहे. त्यामुळे नागपूर उच्च न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष अरुण पाटील यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. नागपुरात ‘ज्युडिशियल ऑफिसर्स ट्रेनिंग सेंटर’ (जोती) आहे, परंतु गेल्या काही वर्षांंपूर्वी मुंबईत महाराष्ट्र ज्युडिशियल अ‍ॅकॅडमी स्थापन करण्यात आल्यामुळे विधि अधिकाऱ्यांना मुंबईतच प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे नागपुरातील जोती हे बंद स्वरूपात आहे. येथे प्रशिक्षण आणि विधिविषयक अभ्यासक्रमासाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध असल्याने राज्य सरकारने विधि विद्यापीठासाठी मिहानमध्ये जागा देऊन जोतीमध्ये २०१६-१७ पासून शैक्षणिक सत्र तात्पुरत्या स्वरूपात सुरू करावे, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली. या याचिकेवर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली होती. आज या प्रकरणावर न्या. भूषण गवई आणि न्या. स्वप्ना जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यावर विभागीय आयुक्तांनी शपथपत्र दाखल केले. ही याचिका दुसऱ्या एका याचिकेसोबत जोडण्यात आली असून २१ एप्रिलला अंतिम सुनावणीसाठी ठेवण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक आणि राज्य सरकारतर्फे सरकारी वकील भारती डांगरे यांनी बाजू मांडली.

 

विद्यार्थ्यांची व्यवस्था अशी असेल

या विद्यापीठाचे कॅंपस तयार होईपर्यंत जोतीमध्ये वर्ग सुरू करण्यात येतील. त्यांच्या राहण्याची व्यवस्था मॉरिस कॉलेज चौकातील आयएएस प्रशिक्षण केंद्राच्या वसतिगृहात असेल. अभ्यासाव्यतिरिक्त क्रीडा स्पर्धा आणि इतर घडामोडीसाठी मानकापूर चौकातील विभागीय क्रीडा संकुलात व्यवस्था करण्यात येईल, असे शपथपत्रात नमूद आहे.

‘क्लॅट’द्वारे प्रवेश होणार

पंजाबातील पटियाला येथील राजीव गांधी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी नागपूर एनएलयुसाठी ‘क्लॅट’ परीक्षा घेईल. केंद्रीय पद्धतीने प्रवेश देण्यात येतील. जोतीमध्ये विद्यार्थ्यांची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी बुलडाणा येथील न्या. साखरकर यांच्याकडे असेल, असेही शपथपत्रात नमूद आहे.