24 October 2020

News Flash

सुस्त काँग्रेसला मस्त संधी..पण?

 विदर्भ ही तशी पक्षाला अनुकूल असलेली भूमी. त्याचा लाभ हा पक्ष अनेक वर्षे उठवत राहिला.

(संग्रहित छायाचित्र)

लोकजागर : देवेंद्र गावंडे

दहाचे पंधरा आमदार होणे हे काही यश नव्हे! तरीही विदर्भातील काँग्रेसवाले आनंदात आहेत. कारण एवढे यश मिळेल अशी आशा या पक्षाच्या नेत्यांना नव्हती. गेल्या सहा वर्षांपासून हे नेते पराभूत मानसिकतेत जगत होते. त्यातले अनेकजण भाजपमध्ये जाण्याच्या विचारात होते. जे नव्हते ते ईव्हीएमला दोष देण्यात धन्यता मानत होते. भाजपने उभ्या केलेल्या अनुकूलतेच्या फुग्याला हे सारे भुलले होते. वास्तव काय याची जराही जाणीव या नेत्यांना नव्हती. लोक नाराज आहेत पण मते देत नाहीत, असा नकारात्मक सूर लावण्यात सारे व्यस्त होते. अशा मनोवृत्तीत जगणाऱ्यांच्या पदरी पाचाचा लाभ पडणे म्हणजे दुष्काळाच्या तेराव्या महिन्यात मुसळधार पाऊस पडण्यासारखेच! त्यामुळे विदर्भातील काँग्रेसजन आनंदी आहेत. खरे तर ही अल्पसंतुष्टी. एखाद्या राजकीय पक्षाने अशा क्षुल्लक वाढीवर समाधान मानणे चूकच, तरीही हे नेते आनंद मनवत असतील तर या पक्षाला सुधारणेची किती गरज आहे, याची जाणीव होते.

विदर्भ ही तशी पक्षाला अनुकूल असलेली भूमी. त्याचा लाभ हा पक्ष अनेक वर्षे उठवत राहिला. नंतर नेत्यांची सरंजामशाही सुरू झाली व पक्षाची पत घसरू लागली. हळूहळू पावले टाकत भाजपने या भूमीवर पूर्ण ताबा मिळवला. त्यामुळे गलितगात्र झालेले काँग्रेस नेते यावेळचा निकाल लागेपर्यंत दुर्बल मानसिकतेतच वावरत होते. निकालाने त्यांच्यात थोडी धुगधुगी आलेली दिसली. प्रत्यक्ष निवडणुकीच्या काळात तर हा पक्ष लढतो आहे की नाही, असेच वातावरण होते. तरीही मतदार या पक्षाच्या बाजूने उभे राहिले. असे भाग्य सर्वच पक्षाच्या वाटय़ाला लाभत नाही. यावेळी हरायचेच आहे असे गृहीत धरून काँग्रेसने विदर्भाची सर्व सूत्रे मुकुल वासनिक यांच्याकडे देऊन टाकली. हे वासनिक दरबारी राजकारणी. जनसामान्यात मिसळणारे अशी त्यांची प्रतिमा कधी नव्हती. त्यांनीही उमेदवार ठरवताना स्थानिक नेते म्हणतील तसे, असेच धोरण बहुतेक ठिकाणी राबवले. तरीही नेहमीप्रमाणे या पक्षाने असंख्य चुका केल्या व स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेतला. भंडारा-गोंदियात प्रफुल्ल पटेल व नाना पटोले या दोघांच्याच हाती सारी सूत्रे होती. त्यामुळे तिथे काही वाद झाला नाही, पण इतर ठिकाणी इतक्या प्रतिकूल स्थितीत नवे प्रयोग करताना सुद्धा साधे भान राखले गेले नाही. या पक्षाच्या श्रेष्ठींना प्रत्यक्ष मतदारसंघातील स्थिती काय, याची माहितीच नव्हती. त्याचा फायदा विदर्भातील अनेक नेत्यांनी घेतला. कुणी उमेदवारी विकण्याचे उद्योग केले.

पश्चिम वऱ्हाडात तर यावरून जाहीर आरोप झाले. उमेदवारी विकायला बसलेले हे नेते किती किलोमीटर चालणार म्हणजे किती देणार, असा प्रश्न निर्लज्जपणे विचारत होते. यामुळे अकोला, बुलढाणा, वाशीम या भागात मतदारांमध्ये अनुकूलता असूनही या पक्षाला फटका बसला. आता हेच तिकीट विक्रेते त्यांच्या कंठातून निष्ठेचे ‘माणिकमोती’ बाहेर काढत आहेत. हाच प्रकार पूर्व विदर्भातही घडला पण एक-दोन मतदारसंघापुरता. याच अर्थनिष्ठेतून अनेक अराजकीय चेहरे पक्षाकडून रिंगणात उतरलेले दिसले. त्यांचा सपशेल पराभव झाला. अशा कठीण स्थितीत पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांवर विश्वास टाकणे केव्हाही उत्तम. जसा बंटी शेळके, गिरीश पांडव, राजेश एकडे, सुरेश भोयर यांच्यावर टाकण्यात आला. यापैकी एकडेच तेवढे सुदैवी ठरले. बाकींच्या पाठीशी पक्षाची पूर्ण ताकद उभी करावी असेही कुणाला वाटले नाही. त्यामुळे चांगली लढत देऊन हे कार्यकर्ते अगदी थोडय़ा मतांनी पडले. यावेळी काँग्रेसने विभागवार कार्याध्यक्ष नेमले. हे पद मिळवणाऱ्यांनी स्वत: विजय मिळवला. इतरांच्या मदतीला ते गेल्याचे दिसले नाही. अमरावती ही यावेळी या पक्षासाठी सुपीक भूमी होती. लोकसभेच्या वेळीच त्याची चुणूक दिसली होती. तरीही या जिल्ह्य़ाकडे लक्ष देण्यासाठी कुणाला वेळ मिळाला नाही.

यवतमाळचेही तसेच. हा एकेकाळचा पक्षाचा बालेकिल्ला. यावेळी येथे नव्या दमाचे उमेदवार असते तर युतीचा पराभव अटळ होता. पण दरबारी राजकारण आडवे आले. खरे तर या जिल्ह्य़ातील ठाकरे, मोघे, पुरके यांच्यासारख्या वयोवृद्ध नेत्यांना पक्षाने सत्कार समारंभ आयोजित करून निवृत्ती द्यायला हवी. किंबहुना असे सोहळे प्रत्येक जिल्ह्य़ात आयोजित करण्याची गरज आहे, पण सुरुवात यवतमाळपासून करायला हरकत नाही. चंद्रपुरात अपक्ष म्हणून ७० हजार मतांनी निवडून येणाऱ्या जोरगेवारांना उमेदवारी नाकारणे ही काँग्रेसची सर्वात मोठी घोडचूक होती. यासाठी वासनिकांसह खारगे व खासदार धानोरकरांचाही जाहीर सत्कार करायला हवा. धानोरकरांच्या पत्नी विजयी झाल्या तरी त्यांना उमेदवारी देणे हेच मुळात चूक होते. मी व माझे नातलग हाच पक्ष, या मानसिकतेमुळेच पक्षाची ही अवस्था झाली आहे. असे जे स्वत:पुरता विचार करणारे नेते असतात त्यांचे राजकारण दीर्घकाळ टिकत नाही. येत्या काही वर्षांत त्याचा प्रत्यय धानोरकरांना येईलच. नातलगांना नाकारण्याचे साधे तत्त्व काँग्रेसला यावेळी पाळता आले नाही. याचे कारण एकच. पक्षाचे झाडून सारे नेते हरण्याच्या मानसिकतेत होते. प्रचाराच्या काळात लढतीत आलेल्या उमेदवारांना थोडी मदत केली तर यश मिळू शकते, हे लक्षात येऊन सुद्धा हा पक्ष शांत व सुस्त राहिला. त्यामुळे अनेक जागा हातून गेल्या. विदर्भात यश मिळवायचे असेल तर दलित, बहुजन मतांचे विभाजन टाळणे गरजेचे असते. दरवेळच्या बसपाऐवजी यावेळी वंचित  ‘वोट कटवा’च्या भूमिकेत राहणार हे स्पष्ट होते. यावर मात करण्यासाठी पक्षाकडे कोणतीही उपाययोजना नव्हती. जे तगडे उमेदवार होते त्यांनी हे मतविभाजन टळावे म्हणून उमेदवारच मॅनेज केले. इतरांचे काय? यावर कुणी विचारच केला नाही.

पक्षश्रेष्ठी तर या महत्त्वाच्या मुद्याकडे लक्ष देण्याच्या मन:स्थितीत सुद्धा नव्हते. स्पर्धेत आलेल्या उमेदवारांसाठी सभा घ्याव्यात, असेही त्यांना वाटले नाही. शरद पवारांच्या करिष्म्याने राष्ट्रवादीचे विदर्भात सहा उमेदवार निवडून आले. त्या पवारांसोबत एखादी संयुक्त सभा घ्यावी, असेही काँग्रेसला वाटले नाही. एवढय़ा सुस्तीत असलेल्या या पक्षाच्या मागे मतदार मात्र गेले. भाजपवर नाराज असलेल्या या मतदारांसमोर दुसरा पर्यायच नव्हता. त्यामुळे आता या निकालानंतर तरी हा पक्ष सुस्ती झटकेल का? विरोधी पक्षाच्या भूमिकेत येईल का? गेल्यावेळप्रमाणे यावेळी सुद्धा या पक्षाचे आमदार सत्ताधाऱ्यांच्या मोहात अडकत राहिले तर हा पक्ष कधीच वर येऊ शकणार नाही. मतदार हुशार आहेत. अशावेळी त्यांच्या विश्वासाला पात्र ठरणे गरजेचे असते. ती संधी यावेळच्या निकालाने काँग्रेसला मिळवून दिली आहे.

devendra.gawande @expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2019 12:43 am

Web Title: lokjagar article by devendra gawande akp 94 2
Next Stories
1 पावसाळी वातावरणाचा स्थलांतरित पक्ष्यांना फटका
2 शिकाऊ परवाना घोटाळा
3 सेनेचा ‘फार्म्युला’ संघ, भाजपला मान्य होणार नाही
Just Now!
X