आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सत्तापक्षाची विविध महोत्सवांची धूम

पुढील वर्षी होऊ घातलेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका व त्यासाठी सहा महिन्यापूर्वी लागू होणारी आचारसंहिता लक्षात घेऊन सत्ताधारी भाजपने पुढच्यावर्षीचे कार्यक्रम याचवर्षी घेण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीवर डोळा ठेवून उचललेल्या पावलामुळे सत्ताधाऱ्यावर टीका होण्याची शक्यता आहे. एरवी मार्च किंवा एप्रिलमध्ये आयोजित करण्यात येणारा नागपूर महोत्सव यावेळी मात्र ऑक्टोबरमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजतात न वाजतात तोच शहरातील नागरिकांना आकर्षित करुन जनमत मिळविण्यासाठी महापालिका प्रशासन आणि नागपूर विकास आघाडीचे पदाधिकारी विविध सांस्कृतिक महोत्सव आणि स्पर्धाचे आयोजन करण्याच्या तयारीला भिडले आहेत.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी महापालिकेने ही पावले उचलली आहेत. शहराच्या विकास कामावरुन विरोधक सत्तापक्षाला लक्ष्य करण्याची चिन्हे दिसू लागताच सत्तापक्षाचे ही महोत्सवाची टूम काढली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी यावेळची महापालिकेची निवडणूक ही प्रतिष्ठेची असल्यामुळे कुठल्याही परिस्थितीत महापालिकेत तिसऱ्यांदा सत्ता मिळविणे हे भाजपसाठी मोठे आव्हान असताना प्रभाग आणि वार्ड पातळीवर पक्षाने काम सुरू केले आहे. यावेळी चार वॉर्डाचा एक प्रभाग केल्यामुळे भाजपला ही पद्धत अनुकुल असली तरी त्यांना जनमत मिळविणे कठीण असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने दरवर्षी ऑक्टोबरनंतर आयोजित करण्यात येणाऱ्या नागपूर महोत्सवासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम, एकांकिका स्पर्धा, क्रीडा स्पर्धा आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घेऊन जास्तीत जास्त लोकांना त्यात सहभागी करुन घेण्याच्या दृष्टीने सत्तापक्षाच्यावतीने प्रयत्न सुरू झाले आहेत आणि  पाच महिन्यापूर्वी नागपूर महोत्सव आयोजित करताना तो शहरात झोनपातळीवर राबविण्यात आला असताना त्यात त्या त्या भागातील कलावंताना सहभागी करुन घेण्यात आले होते. यावेळी त्याच पद्धतीने निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात म्हणजेच दिवाळीच्या दिवसात आयोजित करण्याच्या दृष्टीने कार्यक्रमाची आखणी करून विविध भागातील लोकांना सहभागी करुन घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहे.

गेल्या तीन वर्षांपासून बंद झालेली महापौर करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ही जुलै महिन्यात आयोजित करण्यात आली आहे. राज्य पातळीवरील या स्पर्धेत निवडक एकांकिका सादर होणार असल्यामुळे स्थानिक कलावंताचा सहभाग नावाला राहणार असल्यामुळे त्यांच्यासाठी प्राथमिक फेरीच्या नावाखाली एकांकिका स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.

याशिवाय दिवाळीच्या दिवसात झोन पातळीवर विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. त्यापूर्वी नवरात्र असल्यामुळे गरबा आणि दांडियाच्या निमित्ताने शहरातील विविध झोनमध्ये महोत्सव आयोजित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहे.

याशिवाय महापौर चषक कबड्डी, खो- खो क्रीडा स्पर्धा आचारसंहितेपूर्वी घेण्यात याव्या यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले असून कार्यक्रमाची आखणी केली जात आहे.