18 October 2019

News Flash

वैद्यकीय शिक्षकांच्या तदर्थ पदोन्नतीचा गोंधळ!

राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांत प्राध्यापकांसह सहयोगी प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

महेश बोकडे

मुदत संपल्यावरही नवीन आदेश नाही

राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांत प्राध्यापकांसह सहयोगी प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. ती भरण्यासाठी शासनाने कालबद्ध पदोन्नतीऐवजी तदर्थ (तात्पुरत्या) पदोन्नतीतून पदे भरली. आधी मिळालेल्या १८० दिवसांच्या आदेशाची मुदत संपली. परंतु नवीन आदेश शिक्षकांना मिळाले नाही. जुन्या आदेशानुसार या शिक्षकांवर पदावनत होण्याची टांगती तलवार असताना त्यांना जुन्या ठिकाणीही रुजू केले जात नसल्याने राज्यातील ३०० शिक्षकांचे भवितव्यअधांतरी आहे.

वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अखत्यारित असलेल्या राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांत पदव्युत्तर (पीजी) अभ्यासक्रमाच्या जागा मोठय़ा प्रमाणात वाढवण्यात आल्या आहेत. त्यासाठी ज्या मेडिकल कॉलेजमध्ये भारतीय वैद्यकीय परिषदेच्या (एमसीआय) निकषानुसार वैद्यकीय शिक्षक नाही तेथे शासनाने २०१८ मध्ये मोठय़ा संख्येने सहायक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांना तदर्थ पदोन्नतीतून १८० दिवसांचा नियुक्ती आदेश काढत पदोन्नती दिली. राज्यात सुमारे ४०० शिक्षकांना त्याचा लाभ झाला.

या पदोन्नतीनंतर शिक्षकांना नवीन वैद्यकीय महाविद्यालयांसह जेथे शिक्षक नाहीत अशा ठिकाणी पाठवले गेले. त्यानुसार विदर्भातील गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला येथे मोठय़ा संख्येने शिक्षक उपलब्ध झाले. पदोन्नती तात्पुरती असली तरी शिक्षकाला वाढीव वेतनच मिळायचे. त्यानुसार सहाय्यक प्राध्यापकाला सहयोगी प्राध्यापक पदावर तदर्थ पदोन्नतीनुसार सुमारे ३० हजार रुपयाहून अधिक लाभ मिळायचा. राज्यातील सुमारे ३०० शिक्षकांना हा लाभ मिळाला असतानाच आता १८० दिवसांची मुदत संपली आहे. नवीन आदेश मिळाले नाहीत. जुन्या आदेशानुसार या सर्व शिक्षकांना पदावनत होऊन जुन्या जागेवर रुजू व्हायचे आहे, परंतु नवीन संस्था त्यांना सोडत नाही आणि जुन्या संस्थेत त्यांना रुजू केले जात नाही. त्यामुळे करायचे काय,  हा प्रश्न त्यांच्यासमोर  उभा ठाकला आहे. आचार संहितेमुळे हे आदेश काढता येत नसल्याने हा गोंधळ निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु या शिक्षकांना वेतन तदर्थ पदोन्नतीनुसार की मुदत संपल्यावर जुन्या पदानुसार मिळणार हे प्रश्न कायम आहेत.

कालबद्ध पदोन्नतीने प्रश्न सुटेल

‘‘अनेक वैद्यकीय शिक्षकांचा तदर्थ पदोन्नतीबाबतचा १८० दिवसांचा कालावधी संपला आहे. त्यांना पुन्हा आदेश देऊन संभ्रमावस्था दूर करण्याची गरज आहे. वैद्यकीय शिक्षण खात्याने तातडीने हे आदेश द्यावे, या शिक्षकांना कालबद्ध पदोन्नती दिल्यास हा प्रश्न निकाली निघणे शक्य आहे.’’

– डॉ. समीर गोलावार, अध्यक्ष, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटना, मेडिकल.

कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होणार नाही

‘‘तदर्थ पदोन्नतीची मुदत संपली असली तरी प्रशासनाकडून सर्व शिक्षकांचे शोध प्रबंध, त्यांनी केलेल्या कामांसह विविध बाबी पडताळून बघितल्या जात आहेत. ही प्रक्रिया झाल्यावर त्यांना नव्याने आदेश दिले जातील. त्यापूर्वी कुणालाही आदेशाची मुदत संपल्यामुळे सेवेवरून मुक्त करू नये, अशा सूचना दिल्या आहेत. आचार संहितेशी या प्रक्रियेचा संबंध नाही. कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होणार नाही.’’

– डॉ. तात्याराव लहाने,

संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग, मुंबई.

First Published on April 18, 2019 1:47 am

Web Title: medical teachers ad hoc promotion clutter