लस निर्मिती प्रक्रियेत खारीचा वाटा उचलला

नागपूर : करोना विषाणूवर संशोधन करुन लस निर्मितीसाठी नागपुरातून नेण्यात आलेली माकडे आज, शनिवारी नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आली. पुण्यातील नॅशनल इन्स्टिटय़ुट ऑफ व्हायरॉलॉजीने ही माकडे नेली होती. ती त्यांनी नागपुरात परत आणली.

नॅशनल इन्स्टिटय़ुट ऑफ व्हायरॉलॉजीने करोनावरील लस चाचणीकरिता माकडे नेली. त्यासाठी या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी नागपूर वनविभागाला मागणी के ली. प्रधान मुख्य वनसंरक्षक(वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी रितसर परवानगी दिल्यानंतर प्रादेशिक वनखात्याच्या सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्राच्या चमुने या चाचणीसाठी माकडे पकडून दिली. ही चाचणी पूर्ण झाल्यानंतर आज, शनिवारी संस्थेने माकडे नागपुरात परत आणली. त्यासाठी संस्थेतील तज्ज्ञांची चमू आली होती. ट्रान्झिट ट्रिटमेंट केंद्रातील चमूच्या मदतीने या सर्व माकडांना त्यांच्या मूळ अधिवासात म्हणजे जंगलात मुक्त करण्यात आले. करोनाच्या लस निर्मितीत या माकडांनी खारीचा वाटा उचलला.