नागपूर : राज्यासह देशभरात मेंदूरोग तज्ज्ञांची वाढती संख्या व विविध तपासणीतून होणाऱ्या अचूक रोगनिदानामुळे सर्वत्र मल्टिपल स्क्लेरोसिसचे (एमएस) रुग्ण वाढत आहेत. प्रत्येक १ लाख व्यक्तीमागे देशात ५ ते १० व्यक्तींमध्ये हा आजार आढळतो, असा दावा ट्रॉपिकल न्यूरोलॉजी स्पेशलिटी ग्रुप ऑफ डब्ल्यूएफएनचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी केला. २२ जुलैला जागतिक मेंदूरोग दिन असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार जगात सर्व वयोगटातील २८ लाखांवर हा आजार आहे. काही दशकांपूर्वी हा आजार भारतात दुर्मिळ होता. परंतु मेंदूरोग तज्ज्ञांची संख्या वाढ व एमआरआय तपासणीचे दर परवडणारे झाल्याने या रुग्णांचे अचूक निदान होत आहेत. या रुग्णाच्या मेंदू, पाठीचा कणा येथील मायलिनचा थर खराब होतो. या आजाराचे नेमके कारण अद्यापही स्पष्ट नाही. परंतु अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटकही आजाराला जबाबदार आहेत. या आजाराची २५ ते ३० वर्षे वयात सुरुवात होते. या रुग्णांना नव- नवीन लक्षणांचा अनुभव येतो. वेळीच उपचाराने हे रुग्ण अंशत: किंवा पूर्णपणेही सुधारतात. हा आजार पुन्हा नवीन लक्षणे घेऊन होऊ शकतो. गेल्या २० वर्षांत, रोग सुधारण्याचे औषध विकसित केले गेले. या आजारावर हमखास उपचार नाही. परंतु लगेच उपचार केल्याने त्रास कमी होतो. लवकर रोगनिदान आणि सिद्ध रोग- सुधारित उपचार, रुग्णांची जीवनशैली सुधारण्यास आणि रोग वाढीस रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचेही डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी सांगितले.

आज जागतिक मेंदूरोग दिन महिलांमध्ये आजार अधिक

एमएस हा आजार पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक आढळतो. इंडियन अ‍ॅकेडमी ऑफ न्यूरोलॉजी या संस्थेकडून या आजारावर जनजागृतीसाठी २२ जुलैला सायंकाळी ६.३० ते ८ वाजेपर्यंत ऑनलाईन चर्चासत्र आयोजित केले आहे. त्यात जागतिक फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे अध्यक्ष प्रा. विलियम कॅरोल, बॉम्बे हॉस्पिटल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे प्रा. भीम सेन सिंघल,

डॉ. जे.एम. मूर्ती, डॉ. निर्मल सूर्य, डॉ. मीनाक्षी सुंदरम यांच्यासह जगातील विविध भागातील मेंदूरोग तज्ज्ञ हे उपस्थित राहतील.

– डॉ. चंद्रशेखर मेश्राम, अध्यक्ष, ट्रॉपिकल न्यूरोलॉजी स्पेशालिटी ग्रुप ऑफ डब्लूएफएन.

करोनाकाळात दुर्लक्ष

करोनाकाळात मेंदूच्या विकाराकडे दुर्लक्ष झाले. यावेळी शस्त्रक्रियाही बंद असल्याने आपत्कालीन शस्त्रक्रिया करतानाही रुग्णांची दमछाक झाली. परंतु आता करोनाग्रस्तांची संख्या कमी झाल्याने पुन्हा रुग्ण उपचाराला येत आहेत. करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान डी-डायमर वाढल्यामुळे स्ट्रोक, ब्रेन हॅमरेजसारख्या विकारांच्या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली होती. दुस?ऱ्या लाटेदरम्यान सेरेब्रल म्युकरमायकोसिस म्हणजे काळ्या बुरशीने मेंदूवर प्रभाव पाडला होता. हे विकार जीवघेणे असल्याने त्यावर मेंदूरोग तज्ज्ञांनी मोठय़ा संख्येत उपचार केलेत. तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी दीर्घकालीन मेंदूरोगाने ग्रस्त रुग्णांनी लसीकरण करायला हवे.

– डॉ. अक्षय पाटील, मेंदू शल्यचिकित्सक, क्रिम्स रुग्णालय, नागपूर.

लक्षणे

मुंग्या येणे, हाता-पायात कमजोरी, हालचालीत असंतुलन, थरथरणे, दृष्टीदोष, थकवा, वेदना, भोवळ येणे, मूत्राशय व पोटाचे विकास, लैंगिक समस्या.