महेश बोकडे

केंद्र सरकारसोबत लवकच सामंजस्य करार

केंद्र सरकारच्या जळालेल्या जखमांचे प्रतिबंध व व्यवस्थापन कार्यक्रमाअंतर्गत (एनपीपीएमबी) महाराष्ट्रात नागपूरसह सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये स्वतंत्र मॉडय़ुलर जळीत रुग्ण विभाग होणार आहे. त्यामुळे जळालेल्या रुग्णांनाही बाह्य़रुग्ण विभाग, आंतरुग्ण विभागासह अत्यवस्थ रुग्णांसाठीच्या सर्व स्वतंत्र सोयी उपलब्ध होणार आहेत. या विभागासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग लवकरच केंद्रीय आरोग्य मंत्रालयासोबत सामंजस्य करार करणार आहे.

जळीत रुग्णांसाठीचे स्वतंत्र विभाग प्रस्तावित असलेल्या संस्थेमध्ये नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), धुळेतील श्री भाऊराव हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुण्यातील बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा समावेश आहे. राज्यातील अनेक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत सध्या जळीत रुग्णांसाठी असलेल्या वार्डात बाथिंग युनिट नसणे, अपुऱ्या खाटा, प्लास्टिक सर्जन नाही, उपकरणांची कमी, अशा उणिवा सातत्याने जाणवत असतात. या उणिवांमुळे शासकीय रुग्णालयांमध्ये जळालेल्या अत्यवस्थ रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्राकडून या पाच रुग्णालयांत स्वतंत्र  विभाग करण्याचे निश्चित झाले आहे. या विभागासाठी पहिले तीन वर्षे प्लास्टिक सर्जन, जनरल सर्जन, मानसोपचार तज्ज्ञ, फिजिओथेरपीस्ट, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, परिचर, ड्रेसरसह एकूण २० जणांचे सुमारे तीन वर्षांचे वेतन केंद्र सरकारकडून दिले जाणार आहे. त्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची सोय राज्याला करावी लागणार आहे. मेडिकलकडून या संस्थेसाठी तळमजल्यासह पाच माळ्यांचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत केंद्राकडे गेला आहे. या संस्थेला राज्य शासनाने २५ जानेवारीला मंजुरी देत वैद्यकीय शिक्षण खात्याला केंद्रीय आरोग्य मंत्रालयासोबत करार करण्याचे अधिकार दिले आहेत. त्याबाबत वरिष्ठ पातळीवर कार्यवाहीला गती देण्यात आली आहे.

या सोयी उपलब्ध होणार

जळीत रुग्णांसाठी या विभागात स्वतंत्र आकस्मिक विभाग, बाह्य़रुग्ण विभाग, २० खाटांचे आंतरुग्ण विभाग, रुग्णांवर प्लास्टिक सर्जरीसह विविध प्रक्रिया करण्यासाठी अद्ययावत शस्त्रक्रिया गृह, उपकरणे, प्रत्येक खाटेवर व्हेंटिलेटर, विविध तपासण्यांची सोय, या रुग्णांच्या जखमा धुण्यासाठी बाथिंग युनिट, अत्यवस्थ रुग्णांसाठी विशिष्ट अतिदक्षता विभाग, त्वचा पेढीसह इतरही आवश्यक सोयी राहणार आहेत.

मेडिकलवर विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड या भागातील अत्यवस्थ जळीत रुग्णांचाही भार आहे. नवीन अद्ययावत जळीत विभागामुळे या रुग्णांना वेळेत जागतिक दर्जाचा उपचार मिळून त्यांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करता येईल. या केंद्रात रुग्णाच्या पुनर्वसन प्रक्रियेचीही सोय असेल. शासकीय रुग्णालयांत या पद्धतीचे स्वतंत्र विभाग असलेले महाराष्ट्र देशात पहिले राज्य असेल.

– डॉ. अभिमन्यू निसवाडे, अधिष्ठाता, मेडिकल.