९५ टक्के विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडल्याचा प्रशासनाचा दावा

नागपूर :  अनेक तांत्रिक अडचणी सोडवत विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागाच्या सर्व परीक्षा वेळेत आणि सुरळीत पार पडल्याचा दावा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने केला आहे. आतापर्यंत ६५ हजारांहून विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून राज्यात ऑनलाईन परीक्षेत नागपूर विद्यापीठ सर्वात यशस्वी ठरल्याचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर  मुंबई आणि पुणे विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षेची मागणी केली होती. इतकेच नाही तर गरज पडल्यास आम्ही अन्य विद्यापीठांनाही ऑनलाईन परीक्षेसाठी मदत करू असे आवाहन केले होते. मात्र, या दोन्ही विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा तांत्रिक अडचणीत सापडल्याने परीक्षांचा फज्जा उडाला होता. मुंबई विद्यापीठाच्या नियमित १ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्ण झाली असली तरी त्यात अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. पुणे विद्यापीठात तांत्रिक गोंधळामुळे आतापर्यंत एकूण पाच वेळा परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. यामुळे येथील अनेक विद्यार्थ्यांना आता ऑफलाईन परीक्षा द्यावी लागणार आहे. या तुलनेत नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये अनेक तांत्रिक अडचणी आल्या  तरी त्या सर्व दूर करीत ९५ टक्के विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. विशेष म्हणजे, ८ ऑक्टोबरपासून सुरू झालेली परीक्षा एकदाही रद्द किंवा पुढे न ढकलता नियोजित वेळेत घेतल्याचे विद्यापीठाने सांगितले. याशिवाय जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला मुकले त्यांची परीक्षाही त्वरित घेऊन वेळेत निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचेही कुलगुरू डॉ. चौधरी यांनी सांगितले.

पीएच.डी.च्या जाचक अटींमधून संशोधकांची सुटका

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) दिशानिर्देशानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पीएच.डी.साठीच्या जाचक व नियमबा’ अटी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मार्गदर्शक होण्यासाठी तीन वर्षांची अट रद्द होणार असून पीएच.डी. पदवी मिळताच मार्गदर्शक होता येणार आहे. यासाठी तीन सदस्यीय समिती तयार करून सुधारित निकषांसह दिशानिर्देश काढणार असल्याचा निर्णय आज गुरुवारी विद्वत परिषदेत घेण्यात आला.   विधिसभेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. आर.जी. भोयर यांच्या अध्यक्षतेखाली व एक समिती डॉ. पेशवे यांच्या अध्यक्षतेखालीही तयार करण्यात आली होती. या समितीने पीएच.डी.च्या जाचक अटींमध्ये बदल करीत नव्या शिफारसीचा समावेश केला होता.

ग्रामीण, दुर्गम भागातही समस्या नाही

नागपूर विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यात या परीक्षा ऑनलाईन माध्यमातून सुरळीत पार पडल्या असून ग्रामीण आणि दूर्गम भागात सुद्धा विद्यार्थ्यांना समस्यांचा सामना करावा लागला नाही. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विशेष नियोजन करण्यात आले होते तर महाविद्यालये आणि विद्यापीठ स्तरावर हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या सर्व परीक्षांच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठ, संलग्नित महाविद्यालयांच्या मार्फत बहुपर्यायी सराव प्रश्नपत्रिका, सराव परीक्षा आणि वेळापत्रकांचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले होते, असे कुलगुरू डॉ. चौधरी यांनी सांगितले.

लवकरच निकाल

विद्यापीठातील सर्व शिक्षक हे विद्यापीठाचे बलस्थान असून त्यांनी अत्यंत कमी वेळेत अथक परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षांचे यशस्वी नियोजन केले. या सर्व परीक्षा सुरळीत पार पडल्याबद्दल सर्व प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि तज्ज्ञ समितीतील सर्व मान्यवरांचे आभार. या सर्व परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध असून लवकरच या सर्व परीक्षांचे निकाल जाहीर केले जातील.

– डॉ. सुभाष चौधरी, कुलगुरू, नागपूर विद्यापीठ.