प्रा. साईबाबाला जन्मठेपेची शिक्षा झाल्यामुळे शहरी भागात मोठा फटका बसलेल्या नक्षलवाद्यांनी आता पुन्हा उभारी घेण्यासाठी नवा ‘विस्तार झोन’ तयार केला असून या झोनच्या माध्यमातून शहरी तसेच जंगलातील कारवाया अधिक तीव्र करण्याची योजना आखली आहे. चळवळीच्या या नव्या हालचालीची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने आता अनेक राज्यांना सतर्क केले आहे.

दिल्ली विद्यापीठात इंग्रजीचा प्राध्यापक असलेल्या जी. एल. साईबाबाला गेल्या मार्चमध्ये गडचिरोली न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नक्षल चळवळीच्या शहरी भागातील जाळ्याचा प्रमुख म्हणून साईबाबा काम करीत होता, असा आरोप त्याच्यावर सिद्ध झाला आहे. सध्या नागपूरच्या तुरुंगात असलेल्या साईबाबा प्रकरणामुळे नक्षलवाद्यांना मोठा हादरा बसला. या घडामोडीमुळे नक्षल्यांचे शहरी भागातील काम मोठय़ा प्रमाणावर विस्कळीत झाले आहे. या कामात सुसूत्रता आणण्यासाठी सध्या हैदराबादचा एक विद्रोही कवी, विदर्भातील एक चळवळ समर्थक वकील व दिल्लीत शिक्षण क्षेत्रात सक्रिय असलेला एक तरुण असे तिघे झटत असले तरी बसलेला फटका मोठा असल्याने आता नक्षलवाद्यांनी एक नवा ‘विस्तार झोन’ तयार केला आहे. नक्षलवाद्यांची दंडकारण्य स्पेशल झोन समिती संपूर्ण देशात शक्तिशाली म्हणून ओळखली जाते. या समितीचे विभाजन करून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड स्पेशल झोन समिती नव्याने गठित करण्यात आली आहे. या नव्या समितीची जबाबदारी केंद्रीय समितीचा सदस्य असलेल्या दीपक ऊर्फ मिलिंद तेलतुंबडेवर देण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून अबुजमाड परिसरात सक्रिय असलेल्या दीपकला शहरी भागात काम करण्याचा अनुभव आहे. त्याच्याच नेतृत्वात नक्षलवाद्यांनी पुणे, ठाणे, सुरत, अहमदाबाद परिसरात ‘गोल्डन कॉरिडॉर’ तयार केला होता. यात सक्रिय असलेल्या अनेकांना अटक झाल्यानंतर हा कॉरिडॉर मृतावस्थेत गेला. आता दीपकवर पुन्हा जबाबदारी टाकतानाच त्याच्या दिमतीला चळवळीने मोठी फौजसुद्धा दिली आहे. महाराष्ट्रातील गोंदिया, मध्य प्रदेशातील बालाघाट, मंडला व छत्तीसगडमधील राजनांदगाव परिसरातील जंगलात ही सशस्त्र नक्षलवाद्यांची फौज तैनात राहणार असून यात अनेक जहाल सदस्यांना पाठवण्यात आले आहे. विस्तार झोनमध्ये काम करा, अशा सूचना या सर्वाना देण्यात आल्या आहेत. या सर्व घडामोडींची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली असून त्याबाबत गृह मंत्रालयाला सतर्क करण्यात आले आहे. हा नवा विस्तार झोन जंगली भागातील कारवायांसोबतच शहरी भागावरसुद्धा लक्ष केंद्रित करणार असून हे काम दीपकवर सोपवण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील मंडलाला लागून असलेला भाग, महाराष्ट्रातील नागपूर, पुणे, ठाणे, गुजरातमधील सुरत व अहमदाबाद आणि पश्चिम घाटात चळवळीला गती देण्याचे काम या झोनच्या माध्यमातून होणार आहे. या भागात विस्थापित, शेतकरी, प्रकल्पग्रस्त, कामगार व उपेक्षित समूहाचे प्रश्न हाती घेणे, आंदोलने करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे, या भागात सक्रिय असलेल्या विविध संघटनांना एकत्रित करणे, त्यांच्यात शिरून व्यवस्थेविरुद्धचा आवाज आणखी बुलंद करणे अशी कामे या झोनकडे सोपवण्यात आली आहेत. यासाठी वाटेल तेवढा पैसा खर्च झाला तरी चालेल असे केंद्रीय नेतृत्वाने या झोनला बजावले आहे. मध्यंतरी जंगली भागातील हिंसक कारवाया मंदावल्याने शहरी भागातील कामसुद्धा थंडावले होते. हे लक्षात घेऊन ही नवी रचना तयार करण्यात आली आहे. केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून दलितांवरील अत्याचार वाढले आहेत. हे लक्षात घेऊनच दलित पाश्र्वभूमी असलेल्या दीपकला जाणीवपूर्वक या झोनमध्ये आणण्यात आले, असे गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे.

शहरी समर्थकांवर कारवाई करा

या नव्या विस्तार झोनच्या पाश्र्वभूमीवर शहरी भागात सक्रिय असणाऱ्या समर्थकांवर कारवाई करा, अशी सूचना गृह मंत्रालयाने सर्व नक्षलग्रस्त राज्यांना केली आहे. या समर्थकांविरुद्ध पुरावे मिळत नाहीत, अशी आवई उठवण्यात काही अर्थ नसून पुरावा कसा उभा करायचा याचा साईबाबा प्रकरणापासून बोध घ्या, असेही मंत्रालयाने या राज्यांना बजावले आहे.

शहरी कॅडरच्या सूचनेवरून हिंसाचार?

गेल्या दोन वर्षांत नक्षल्यांच्या जंगलातील हिंसक कारवाया थंडावल्या होत्या. त्यातून आलेल्या मरगळीमुळे चळवळ विस्ताराला खीळ बसत असल्याने काही तरी मोठी कारवाई घडवून आणा, असा संदेश गेल्या फेब्रुवारीत शहरी कॅडरकडून जंगलात देण्यात आला. त्यानंतरच सुकमा परिसरात मोठा हिंसाचार झाला. हा संदेश गुप्तचर सूत्रांनी वेळीच पकडला, पण समन्वयाभावी त्यावर लक्ष देण्याचे राहून गेल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. नक्षलविरोधी अभियानात काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेसुद्धा या माहितीला दुजोरा दिला आहे.

शहरी भागावरसुद्धा लक्ष : नवा विस्तार झोन जंगली भागातील कारवायांसोबतच शहरी भागावरसुद्धा लक्ष केंद्रित करणार असून हे काम दीपकवर सोपवण्यात आले आहे. मंडलाला लागून असलेला भाग, महाराष्ट्रातील नागपूर, पुणे, ठाणे, गुजरातमधील सुरत व अहमदाबाद आणि पश्चिम घाटात चळवळीला गती देण्याचे उद्दीष्ट असल्याचे मानले जाते.