|| राखी चव्हाण
जंगलाची संलग्नता तुटत चालल्याने ९० टक्के प्रवासात नाल्यांचा वापर करणाऱ्या टिपेश्वर अभयारण्यातील एका वाघाने पाच महिन्यांत तब्बल १३०० किलोमीटरचा प्रवास करत ज्ञानगंगा अभयारण्य गाठले. या घटनेमुळे वनखात्याला आता वाघांच्या व्यवस्थापनात नवीन क्षेत्रांचाही विचार करावा लागणार आहे.
स्वत:चा अधिवास शोधण्यासाठी वाघ स्थलांतर करतो. यादरम्यान तो कोणत्याही ठिकाणी, कितीही लांब पल्ल्याचे अंतर तुडवतो. मात्र, स्थलांतरासाठी जंगलाचा वापर करणारे वाघ आता जंगलाची संलग्नता (कनेक्टिव्हिटी) तुटत चालल्याने मिळेल त्या मार्गाने स्थलांतर करत आहेत. या परिस्थितीत व्यवस्थापन योग्य नसेल तर मात्र मानव-वन्यजीव संघर्षांची दाट शक्यता आहे. टिपेश्वर अभयारण्यातील वाघाने मानवी वस्ती आणि शेती असलेली जागा स्थलांतरासाठी निवडली, पण या ठिकाणी तो फारसा थांबला नाही. स्थलांतरणासाठी शेतातून जाण्याऐवजी नाल्याचाच वापर त्याने अधिक केला. एवढेच नाही तर दिवसापेक्षा रात्रीचा प्रवास त्याने अधिक केला. वाघिणीपासून वेगळे झालेले बछडे त्यांचा अधिवास शोधण्यासाठी कोणत्या मार्गाचा वापर करतात, याकरिता दोन वाघांना रेडिओ कॉलर लावण्यात आली. त्यांनी तेलंगणा राज्याच्या सीमेलगतचा भाग आणि पांढरकवडालगतच्या क्षेत्रात त्यांचा अधिवास शोधण्यास सुरुवात केली. जुलै २०१९च्या मध्यात सी३ हा वाघ तेलंगणा येथे स्थलांतरित झाला व आदिलाबाद शहराच्या जवळ गेला. मात्र, अवघ्या दहा दिवसांत तो टिपेश्वरला परत आला. आता तो त्याच ठिकाणी स्थिरावला आहे. तर सी२ या वाघाला रेडिओ कॉलर लावली नसली तरीही पैनगंगा येथील कॅमेरा ट्रॅपमध्ये त्याचे छायाचित्र आले. सी१ या वाघाने १३०० किलोमीटरची भटकंती केली. टिपेश्वर अभयारण्यातील टिपेश्वर आणि मारेगावच्या पुनर्वसनानंतर ६०० हेक्टरचा परिसर वनखात्याला मिळाला. चांगल्या व्यवस्थापनामुळे वाघांना प्रजननासाठी चांगली जागा तयार झाली. त्याचाच परिणाम म्हणजे एकाच वाघिणीचे तीनही बछडे या अभयारण्यातून नव्या अधिवासाच्या शोधात स्थलांतरित झाले आहेत.
स्थलांतरण व्यवस्थापन चमू
प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव-पूर्व) बी.एस. हुडा, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ. रविकिरण गोवेकर, उपवनसंरक्षक व विभागीय वनाधिकारी (वन्यजीव) पांढरकवडा, विभागीय वनाधिकारी आदिलाबाद, किनवट वनविकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक, उपवनसंरक्षक पुसद, वाशिम, अकोला, बुलढाणा, विभागीय वनाधिकारी हिंगोली.
‘टी१सी१’ वाघाचा प्रवास
- जून २०१९ मध्ये कॉरिडॉरच्या बाजूने बाहेर जात पांढरकवडा विभाग ओलांडून आदिलाबाद विभागात प्रवेश.
- ऑगस्ट व सप्टेंबरदरम्यान आदिलाबाद व नांदेडच्या जंगलात बराच काळ आणि त्यानंतर पैनगंगा अभयारण्यात वास्तव्य.
- ऑक्टोबरमध्ये पुसद विभाग आणि त्यानंतर इसापूर अभयारण्यात प्रवेश. अखेरच्या आठवडय़ात मराठवाडय़ातील हिंगोलीत दाखल.
- नोव्हेंबरच्या पूर्वार्धात अकोला विभाग आणि उत्तरार्धात बुलढाणा विभागात दाखल.
- चिखली व खामगावजवळ आल्यानंतर १ डिसेंबरला ज्ञानगंगा अभयारण्यात प्रवेश.
टी१ या वाघिणीने जून २०१६ मध्ये सी१, सी२ आणि सी३ या तीन वाघांना टिपेश्वर अभयारण्यात जन्म दिला. २०१९च्या सुरुवातीला हे तिन्ही बछडे वाघिणीपासून वेगळे झाले. २५ फेब्रुवारी २०१९ला सी३ आणि २७ फेब्रुवारी २०१९ला सी१ या वाघाला देहरादूनच्या भारतीय वन्यजीव संस्थानचे डॉ. पराग निगम आणि डॉ. बिलाल हबीब यांनी रेडिओ कॉलर लावली.
वाघ स्थलांतरणादरम्यान त्यांचे मार्ग स्वत:च निवडतात. त्यामुळे जंगलाची संलग्नता तुटत चालल्यानंतर ते कोणता मार्ग निवडता येईल हे सांगता येत नाही. ‘टी१-सी१’ हा वाघ सध्या तरी ज्ञानगंगा अभयारण्यात स्थिरावला आहे. मात्र, या ठिकाणीही तो किती काळ थांबेल हे सांगता येणार नाही. तो आता जोडीदाराच्या म्हणजेच वाघिणीच्या शोधात आहे. त्यामुळे येथूनही तो इतरत्र स्थलांतरित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. -डॉ. रविकिरण गोवेकर, मुख्य वनसंरक्षक व क्षेत्रसंचालक, पेंच व्याघ्रप्रकल्प