वाहनांसोबत मोबाईल क्रमांक जोडला नसल्याचा परिणाम

मंगेश राऊत, नागपूर</strong>

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात मोठय़ा प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून आता केंद्र सरकारने ‘वन नेशन वन चालान’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. पण, प्रादेशिक परिवहन विभागाकडे (आरटीओ) वाहनांसोबत मोबाईल क्रमांकाची पूर्णपणे जोडणी झाली नसताना या चालान पद्धतीने मोठा संभ्रम निर्माण झाला असून दुसऱ्याच्या वाहनाचे चालान तिसऱ्यालाच मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत आता अनेक शहरांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याचा फायदा वाहतूक नियंत्रण व गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना होतो. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ऑनलाईन चालान पाठवण्याची पद्धत सुरू झाली. देशात कोणत्या वाहनांवर कुठे कारवाई झाली, याची माहिती होण्यासाठी ‘वन नेशन वन चालान’ हा उपक्रम हाती घेण्यात आला, परंतु असे चालान पाठवताना वाहन मालकाच्या नोंदणीशी मोबाईल क्रमांक जोडलेला हवा. तरच वाहतूक नियम मोडताच त्या वाहन मालकाच्या मोबाईल क्रमांकावर ऑनलाईन चालानाची माहिती उपलब्ध होईल. तसेच त्या संदेशात चालान भरण्यासाठी ‘पेमेंट गेटवे’ उपलब्ध असेल. सध्या हा उपक्रम पथदर्शी उपक्रम म्हणून राबवण्यात येत आहे. पण, अनेक वाहनांसोबत त्यांच्या मालकांचे मोबाईल क्रमांकच जोडलेले नाहीत. प्राप्त माहितीनुसार, केवळ गेल्या दोन वर्षांमध्ये नोंदणी करण्यात आलेल्या वाहनांशी मोबाईल क्रमांक जोडण्यात आले आहेत. त्यापूर्वी नोंदणी करण्यात आलेल्या वाहनांचे मोबाईल क्रमांक आरटीओ कार्यालयांच्या अभिलेखात नाहीत. त्यामुळे जुनी वाहने रस्त्यांवर धावत असताना त्यांच्याकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांना ‘वन नेशन वन चालान’ अंतर्गत ऑनलाईन चालान जाऊ शकत नाही. यंत्रणेत त्रुटी असताना तिची अंमलबजावणी सुरू केल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

पुन्हा कागदी चालान पाठवण्याचे आदेश

या यंत्रणेतील त्रुटी वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना ऑनलाईन चालान केलेल्या लोकांना पुन्हा कागदी चालान पाठवण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. याचाच अर्थ एकाच कामाची पुनरावृत्ती होत आहे.

मोबाईल क्रमांक बदलल्याचा फटका

तरुणाई अनेकदा महिने, दोन महिन्यांत मोबाईल क्रमांक बदलत असते. वाहन खरेदीवेळी देण्यात आलेला मोबाईल क्रमांक नंतर संबंधिताने बंद केल्यास व कालांतराने तो क्रमांक दुसऱ्याने विकत घेतल्यास दुसऱ्याच्या वाहनाचा चालान तिसऱ्याच व्यक्तीला प्राप्त होईल. असे घडलेही आहे. उपराजधानीतील वाहनाचा चालान संदेश मुंबईतील प्रतिष्ठित व्यक्तीला प्राप्त झाला. संबंधित व्यक्तीने वाहतूक पोलिसांशी संपर्क केल्यानंतर त्या क्रमांकावर गेलेला चालान रद्द करण्यात आला. पण, असे प्रकार सातत्याने समोर येत आहेत.