२४ तासांत २०७ मृत्यू;  ६,९२८ बाधितांची भर

नागपूर : विदर्भाच्या अकरा जिल्ह्य़ात २४ तासांत २०७ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू तर ६ हजार ९२८ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली. दरम्यान विदर्भात २४ तासांत नवीन रुग्णांची संख्या कमी होत असताना मृत्यू दोनशेहून अधिक असल्याचे चिंता कायम आहे.

विदर्भात १० आणि ११ मे असे दोन दिवस करोना मृत्यूची संख्या दोनशेच्या खाली गेली असतानाच १२ आणि १३ मे असे दोन दिवस मृत्यूसंख्या पुन्हा दोनशेवर गेली आहे. शनिवारी पुन्हा दोनशेहून अधिक मृत्यू नोंदवल्या गेल्याने येथे करोनाची चिंता कायम आहे.

शनिवारी नागपुरात २४ तासांत झालेल्या मृत्यूंमध्ये शहरातील २२, ग्रामीण १४, जिल्ह्य़ाबाहेरील १२, अशा एकूण ४८ रुग्णांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्य़ात २४ तासांत १ हजार ५१० नवीन रुग्ण आढळले. विदर्भातील एकूण मृत्यूत नागपूर जिल्ह्य़ातील २३.१८ टक्केमृत्यूंचा समावेश आहे.

भंडाऱ्यात ७ रुग्णांचा मृत्यू तर १७१ रुग्ण, अमरावतीत २० मृत्यू तर १ हजार ९७ रुग्ण, चंद्रपूरला २१ मृत्यू तर १ हजार १६ रुग्ण, गडचिरोलीत १२ मृत्यू तर २७६ रुग्ण, गोंदियात ७ मृत्यू तर ११८ रुग्ण, यवतमाळला २० मृत्यू तर ५२९ रुग्ण, वाशीमला १० मृत्यू तर ५७८ रुग्ण, अकोल्यात २७ मृत्यू तर ५२३ रुग्ण, बुलढाण्यात ५ मृत्यू तर ८७८ रुग्ण, वर्धा जिल्ह्य़ात ३० मृत्यू तर २३२ नवीन रुग्ण आढळले.