महापालिकेचे कोटय़वधी रुपये गाळात; सहा वर्षांच्या प्रयत्नानंतरह नदी स्वच्छ होईना

शहरातील सर्व घाण सोबत घेऊन वाहणाऱ्या नाग नदीला लंडनच्या थेम्स नदीसारखे सुंदर बनवण्याचे आणि या नदीतून जलपर्यटनाचे भव्य स्वप्न उराशी बाळगून नागपूर महापालिकेने सहा वर्षांआधी नागनदी स्वच्छता अभियान सुरू केले. त्याचा पद्धतशीर गाजावाजाही करण्यात आला, परंतु या सहा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतरही नाग नदीचे बकाल रूप तसेच कायम असून तिचे स्वच्छता अभियान म्हणजे केवळ ‘पब्लिसिटी फंडा’ ठरला आहे.

महापालिकेचे कोटय़वधी रुपये नागनदीच्या गाळात विरले तरी आर्थिक स्थिती बिकट असतानाही महापालिका दरवर्षी तेच तेच अभियान राबवून पुन्हा लाखोंची उधळपट्टी करीत आहे. तत्कालीन महापौर अनिल सोले यांनी नदी स्वच्छता अभियानाला २०१३ मध्ये सुरुवात केली. महापालिकेने नदी स्वच्छ झाल्याचा दावा करीत काही भागात बदक सोडले. नदीतील बदकांची छायाचित्रे प्रकाशित झाल्यानंतर काही दिवसात बदक बेपत्ता झाले. ते अद्याप सापडलेले नाहीत. मात्र, महापालिकेने हे अभियान पुढेही चालू ठेवण्याचा चंग बांधला आणि त्यात पोहरा आणि पिवळी नदीला देखील सामावून घेतले, पंरतु गेल्या सहा वर्षांनंतर त्याच ठिकाणीचे गाळ, माती आणि कचरा काढण्याचे सारखे काम सुरू आहे. मात्र, नदी काही खोल होत नाही, गाळ काही उपसला जात नाही आणि कचरा काही स्वच्छ होत नाही. यामुळे १७ किमी लांब नाग नदी सफाईसाठी आणखी काही वर्षे लागतील काही सांगता येत नाही.  नागनदीत शहरातील सांडपाणी सोडण्यात येते आणि कचरापेटीसारखा तिचा वापर होतो. परिणामी, या नदीमुळे गोसेखुर्द धरणाचे पाणी अशुद्ध झाले. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या. यामुळे  २०१३ साली महापालिकेने नागनदी साफ करण्यासाठी ३३ लाख २२ हजार ३१५ रुपये खर्च केले. सोबतच दोन नाल्यांची सफाई करण्यात आली. शक्ती नाला (गड्डीगोदाम) साफ करण्यासाठी ५० हजार रुपये, चांभार नाला साफ करण्यासाठी १९ लाख २० हजार रुपये खर्च केले. याशिवाय इतर खर्च म्हणून चार लाख ४८ हजार ८७५ रुपये खर्च करण्यात आला, परंतु काही दिवसात नदी अवस्था जैसे थे झाली. तेव्हापासून दरवर्षी उन्हाळ्यात नदी स्वच्छता अभियान राबवले जात आहे.

किती खर्च झाला, किती गाळ निघाला माहितीच नाही

दरवर्षी होत असलेला खर्च आणि त्यातून निघालेला गाळ, माती, कचरा याची नोंद ठेवलेली नाही. दोन वर्षांपासून नदी स्वच्छता अभियान लोकसहभाग आणि सीएसआर निधीतून केले जात आहे. खासदार जल व पर्यावरण संरक्षण योजनेअंतर्गत हे अभियान सुरू आहे. महापालिका वाहनांच्या इंधानावर खर्च करते आणि तो खर्च सीएसआरमधून मिळावा म्हणून जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर करतात. २०१६ ला इंधानावर ४० लाख रुपये खर्च झाले आणि एक लाख ७३ हजार मॅट्रिक टन कचरा काढण्यात आला, अशी नोंद आहे. कचरा डम्पिंग यार्डमध्ये पाठवला जातो. माती, गाळ नदीतील असमतल जागेवर किंवा खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येते. आजपर्यंत नदीतील गाळ किंवा माती नदीबाहेर टाकल्याची नोंद नाही. यावर्षी ७ मेपासून पुन्हा अभियानाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी वेगवेगळ्या शासकीय विभागाकडून तसेच खासगी उद्योजकांकडून २४ पोकलेन, ३० जेसीबी, ३६ टिप्परची व्यवस्था करण्यात आली. यात महापालिकेचे ४२ कर्मचारी काम करीत आहेत.

दरवर्षी नागनदी नफाई करणे, त्यासाठी लोकसह भाग घेणे, प्रसिद्धी माध्यमातून चर्चा घडवून आणणे म्हणजे लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे. नागनदी स्वच्छतेच्या नावाखाली देखावा केला जात आहे. राजकीय दबावापोटी उद्योजक, खासगी संस्था सहभाग देत आहे, परंतु त्याची फलश्रूती शून्य आहे. महापालिकेचे मनुष्यबळ, महापालिकेचा इंधनावरील खर्च छायाचित्र काढण्यासाठी वाया घालवला जात आहे. काहीतरी करीत असल्याचा भास करण्यासाठी हा खटाटोप आहे. – तानाजी वनवे, विरोधी पक्षनेते, महापालिका.

शहरातील तीनही नद्यांची स्वच्छता सुरू आहे. ज्या-ज्या भागातून गाळ काढणे शक्य होते तेथून गाळ काढले जाते. सहा वर्षांपासून हे काम सुरू असले तरी पुढील वर्षीपर्यंत या नगी स्वच्छ झाली. या निर्णयापर्यंत पोहोचता येईल. त्यानंतर एक-दोन वर्षांनी १६०० कोटी रुपयांचे नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाकडे ही नदी जाईल. केंद्राकडून निधी प्राप्त झाल्यानंतर काम सुरू होईल.  – नंदा जिचकार, महापौर, नागपूर.