|| राखी चव्हाण

ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात तब्बल २५ वर्षांनंतर एकाच घटनेची पुनरावृत्ती का व्हावी, यावर व्याघ्रप्रकल्प व्यवस्थापन नव्हे तर राज्याच्या वनखात्याने विचार करण्याची वेळ आली आहे. २५ वर्षांपूर्वी याच व्याघ्रप्रकल्पात हत्तीच्या हल्ल्यात माहूताचा बळी गेला. त्यानंतरही व्यवस्थापन सुधारले नाही आणि पुन्हा तीच घटना घडली. ‘एलीफंट प्रोजेक्ट गाईडलाईन्स’चा वापर राज्याच्या वनखात्याकडून होत नाही हे या घटनांवरुन आता स्पष्ट झाले आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात दोन मादी हत्ती, एक नर हत्ती आणि एक हत्तीचे पिलू असे चार हत्ती आहेत. तर जवळच्याच कमलापूर येथे सुमारे दहा हत्ती आहेत. ताडोबा व्याघ्रप्रकल्पात हत्तीची सफारी बंद करण्यात आली आहे. तसेच हत्तीकडून करण्यात येणारी कामेही बंद करण्यात आली आहेत. केवळ गस्तीसाठी कधीतरी हत्तीचा वापर केला जातो. मात्र, प्रशिक्षित माहूत नसल्याने व्याघ्रप्रकल्पाच्या  दुर्घटना झाली तर त्याला जबाबदार कोण, या व्याघ्रप्रकल्पात हत्ती का ठेवले, तसेच कमलापूर येथेही हत्ती नेमके कशासाठी ठेवले, हाही प्रश्नच आहे. ताडोबात सध्याच्या स्थितीत माहूतच नाही. सुमारे दहा महिन्यापूर्वी एक माहूत सेवानिवृत्त झाला आणि तेव्हापासून हे पदच भरण्यात आलेले नाही. हत्तीला खाऊ घालणारेच त्याचा सांभाळ करतात. गेल्या दहा-दहा वर्षांपासून ते काम करत आहेत. ते वरिष्ठ झालेत की त्यांनाच माहूत बनवले जाते. हे देखील एकदाचे मान्य करता येईल, पण त्यांना निदान योग्य ते प्रशिक्षण तरी द्यायला हवे. ते प्रशिक्षित नसल्यानेच हत्तीच्या हल्ल्यात त्याचा बळी गेला. हत्ती प्रकल्प मार्गदर्शक तत्त्वे धुडकावूनच कामे केली जात आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील हत्तीने रात्री धुमाकूळ घातला. माहूताला त्या हत्तीला आवरत आले नाही कारण त्यावेळी हत्तीच्या हार्मोन्स पातळीत प्रचंड वेगाने बदल होत होते. या स्थितीत हत्तीचा वेग अधिक असतो आणि १०० मीटर जवळ येण्यासाठी त्याला सेकंदाचा अतिसुक्ष्म वेळ लागतो. हाच जर प्रशिक्षित माहूत असता तर या स्थितीत हत्तीला कसे सांभाळायचे हे त्याला कळले असते. त्यावेळी एका पशुवैद्यकाने स्वत:च्या जीवावर उदार होऊन हत्तीला यशस्वीरित्या बेशुद्ध केले. केरळ तसेच इतर राज्यातील तज्ज्ञ व अनुभव पशुवैद्यकाशी संपूर्ण परिस्थितीची चर्चा करुन पिसाळलेल्या हत्तीला बेशुद्ध करण्याचा निर्णय त्याने घेतला. ही कृती त्यावेळी घडली नसती तर हत्तीने मोहूर्लीच्या आसपासची गावे उध्वस्त करुन टाकली असती. मात्र, या पशुवैद्यकांना स्थायी करण्याची कृतीदेखील वनखात्याकडून घडून आलेली नाही. आता तर पशुवैद्यकांची पदेही मंजूर झाली आहेत. हत्तीसाठी प्रशिक्षित माहूत असून चालत नाही तर प्रशिक्षित व अनुभवी पशुवैद्यक देखील आवश्यक आहे. हार्मोन्स पातळीत १०० टक्के वेगाने बदल होत असताना त्याठिकाणी प्रशिक्षित व अनुभवी माहूत आणि पशुवैद्यक दोघांचीही आवश्यकता असते. या व्याघ्रप्रकल्पात इतक्या घटना होत असताना माहूत तर सोडाच, पण पशुवैद्यक देखील स्थायी नाही. या प्रकरणात अस्थायी पशुवैद्यकानेच वनखात्याची इज्जत वाचवली, अन्यथा अवघे मोहूर्ली गाव उध्वस्त झाले असते. त्यामुळे आतातरी वनखात्याने हत्ती प्रकल्प मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करावी, अन्यथा वाघामुळे होणारा मानव-वन्यजीव संघर्ष हत्तीमुळे देखील होण्याची दाट शक्यता आहे.

‘एलिफंट प्रोजेक्ट गाईडलाईन्स’नुसार एका हत्तीमागे एक माहूत आणि एक चाराकटर असावा लागतो. त्याला वारंवार प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात चार हत्तींमागे चार माहूत आणि चार चाराकटर असणे आवश्यक असताना मार्गदर्शक तत्त्वे पूर्णपणे डावलण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथेही प्रत्येक हत्तीमागे माहूत आणि चाराकटर नाही. याठिकाणी हत्ती नेमके का ठेवले, हे देखील अजूनपर्यंत कुणाला कळले नाही. ताडोबात जी घटना झाली ती कमलापूर येथेही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर राज्यात ज्याठिकाणी हत्ती आहेत, तेथेही या घटनांची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही.