देवेंद्र फडणवीस यांचा सरकारला टोला

नागपूर :  वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्राची सर्वात जास्त बदनामी झाली आहे. वाझे प्रकरणाबाबत एकामागून एक पुरावे समोर येत असल्याने आणि आणि फोन टॅपिंग प्रकरणात अनेकाचे बिंग फुटणार असल्याने वाझेचे सगळेच मालक चिंतेत आहेत, असा टोला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.  फडणवीस शनिवारी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, फोन टॅपिंगची चौकशी सुरू असताना महाविकास आघाडीतील नेते आता बाजू सावरण्यासाठी विरोधी पक्षावर आरोप करत आहे. परंतु, पोलीस दलातील बदल्यांसाठी पैसे घेणे, हफ्ते वसुलीचे लक्ष्य देणे, यातून एक सिंडिकेट राज वाझे यांच्या भरवशावर चालविण्यात आले. एनएआयच्या चौकशीत सारे काही स्पष्ट होणार आहे. बदल्याच्या रॅकेटसंदर्भातील अहवाल मी फोडला असा आरोप करण्यात आला आहे. परंतु, पोलीस बदल्याच्या अहवाल केंद्रीय गृहसचिवांकडे गेल्याने सारेच घाबरले आहेत.  मी केवळ कव्हरिंग लेटर दिले होते. खरे तर नवाब मालिक यांनीच अहवाल फोडला, असेही फडणवीस म्हणाले.

डीव्हीआर, सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याबाबतचा आरोप करण्यात आला. पण, पोलिसांचे सीसीटीव्ही कोणी गायब केले तरी सव्र्हरमध्ये बॅकअप आहे. प्रायव्हेट फुटेज गायब होऊ  शकते, पण पोलिसांचे नाही. अशी व्यवस्था आहे की त्याचे  मिरर इमेजिंगसुद्धा उपलब्ध आहे.   तशी व्यवस्था मी गृहमंत्री असतानाच केली आहे.  डिजिटल फुटप्रिंट एक माणूस नष्ट करू शकत नाही.  वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीला बोलावले नाही असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला, पण ते काम आमचे नाही. एनआयए ते करेल असेही फडणवीस म्हणाले. काँग्रेसचे नेते सचिन सावंतांना मी काय उत्तर द्यायचे? त्यांना काय समजते? ते रोज काहीही बोलतात. त्यांना आमचे आमदार राम कदम उत्तर देतील, अशा शब्दात त्यांनी सावंतांच्या आरोपांचा समाचार घेतला.

नागपुरातील करोना स्थिती भयावह

नागपुरातील रुग्णालयात खाटा उपलब्ध नाही. देशातील करोनाची स्थिती आणि महाराष्ट्रातील स्थिती यात इतके अंतर का, याचा विचार राज्य सरकारला करावा लागेल. ज्या लसी केंद्राने दिल्या  त्या अजूनही वापरलेल्या नाहीत. त्यामुळे केंद्रावर टीका करण्यापेक्षा प्रत्यक्ष करोनावर नियंत्रण कसे आणता येईल त्यादृष्टीने सरकारने उपाय केले पाहिजे, असेही फडणवीस म्हणाले.