शहरवासीयांना शुद्ध प्राणवायू मिळेनाच; वृक्षलागवड मोहिमेचा फज्जा

शहरात दरवर्षी हजारोंच्या संख्येने विविध सामाजिक संस्था आणि इतर माध्यमातून वृक्षलागवड होते. मात्र, त्यातील झाडे जगण्याचे प्रमाण हे केवळ दहा टक्के असून उर्वरित झाडे वृक्षकवच आणि संगोपनाअभावी मृत पावतात. विकास कार्यामुळे पुरेशा प्राणवायूला मुकणाऱ्या शहरवासीयांना शुद्ध प्राणवायू मिळावा, हा हेतू मात्र त्यामुळे साध्यच होत नसल्याचे समोर आले आहे.

राज्य शासनाने ५० कोटी वृक्षलागवडीचा गजर केला तेव्हा त्यात विविध सामाजिक संस्थांसोबत शासकीय यंत्रणांनाही सामावून घेतले. पण, ही वृक्षलागवड या शहरातही केवळ फार्स ठरल्याचे आता निष्पन्न होत आहे. शहराची जबाबदारी असणाऱ्या महापालिकेचेच उदाहरण लक्षात घेतले तर वृक्षलागवडीच्या पार पडलेल्या तिन्ही टप्प्यात त्यांची कामगिरी अतिशय सुमार आहे. दुसऱ्या टप्प्यात महापालिकेला ४५ हजार वृक्षलागवडीचे लक्ष्य होते. केवळ ३५ हजार वृक्षलागवड केली. तिसऱ्या टप्प्यातही ५० हजारपैकी २९ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्टच साध्य केले.  संगोपनाची स्थिती यापेक्षाही दयनीय आहे.

महापालिकाच नव्हे तर वनखात्याची देखील जवळजवळ हीच अवस्था आहे.  म्हणूनच हिंगणा एमआयडीसी परिसरातील वनखात्याच्या ८०० हेक्टर जमिनीवरील चार हजारापैकी केवळ ५० टक्केच वृक्षलागवड यशस्वी झाली.  संगोपनाअभावी या रोपटय़ांच्या काडय़ा तेवढया शिल्लक राहिल्या. अति उच्चदाबाच्या वीज वाहिनीमुळे आग लागून काही रोपटी जळाली. दुसरा टप्पा सुरू होण्यापूर्वी अयशस्वी वृक्षलागवडीचे खड्डे मोठे करून आणि त्याठिकाणी माती भरून नवीन रोपटी लावण्याचा प्रकारही झाला.

दरवर्षी एक लाख वृक्षलागवड करून त्याचे योग्य पद्धतीने संगोपन करून झाडे जगवली तर २०३० पर्यंत हिरवळीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या गांधीनगर शहराला मागे टाकता येऊ शकते. गेल्यावर्षी २२ एप्रिलला वसुंधरा दिनानिमित्त २०३० पर्यंत या शहराला शुद्ध हवेच्या बाबतीत ‘मॉडेल सिटी’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, वृक्षलागवडीचा महापालिकेचा वेग आणि त्याहूनही वाईट असणारी संगोपनाची स्थिती पाहता हा निर्णय प्रत्यक्षात उतरेल का, याविषयी शंकाच आहे.

४५ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट

१ ते ७ जुलै २०१७ मध्ये महापालिकेला ४५ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी फ्लॅट योजना, सोसायटी, वॉर्ड, मोहल्ला, सार्वजनिक ठिकाणी १५ हजार, शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी ७५०० तर सिमेंट रस्ते, मुख्य रस्त्यांच्या बाजूला ७५०० आणि कार्पोरेट कंपन्या, संस्था, क्रेडाईसारख्या संस्थांमध्ये १५ हजार अशी वृक्षलागवडीची विभागणी करण्यात आली. .

लोकसंख्येच्या तुलनेत संख्या कमी

उपराजधानी हिरवळीच्या बाबतीत चौथा क्रमांक मिरवत असली तरीही शहरातील एकूण झाडांपैकी ५० टक्के झाडे ही एकटय़ा सिव्हिल लाईन्स परिसरात आहे. उर्वरित ५० टक्के हिरवळी शहरातल्या इतर भागात आहेत. शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत झाडांची संख्या कमी आहे. एका व्यक्तीमागे किमान तीन ते कमाल १७ झाडांची गरज आहे. असे असताना शहरात १२१ व्यक्तीमागे १०० झाडे असे प्रमाण आहे. यात देखील धूळ शोषून घेणाऱ्या वृक्षांची संख्या तुलनेने  कमी  असून शोभिवंत झाडांची संख्या अधिक आहे.

माहिती अभावी ९० टक्के वृक्षलागवड अयशस्वी

आवश्यक माहितीच्या अभावामुळे शहरातील ९० टक्के वृक्षलागवड अयशस्वी ठरत आहे. वेळ, वृक्षलागवडीची जागा, वृक्ष प्रजातींची निवड, संगोपन, वैज्ञानिकदृष्टय़ा होणारी वृक्षलागवड या सर्व बाबींचा अभाव आहे. मोसमी पाऊस आणि त्यादरम्यानच्या काळात तसेच एक फुटाहून अधिक उंचीची झाडे लावली गेली तरच वृक्ष जगण्याची शक्यता अधिक असते. त्यातही झाडांना कवच असेल तर वृक्षलागवडीच्या यशाचे प्रमाण वाढू शकते. मात्र, हे कवच नसेल तर मग लावण्यात येणाऱ्या झाडांची उंचीसुद्धा अधिक असायला हवी.

– संजय देशपांडे, सृष्टी पर्यावरण संस्था