करोना काळातील टाळेबंदीमुळे अनेकजण बेरोजगार झाले असून काहींनी भाजीपाला, पानठेला व चहाचा व्यवसाय थाटला आहे. या व्यवसायांमध्येही  प्रचंड स्पर्धा वाढली आहे. या स्पध्रेतूनच उपराजधानीत २४ तासांमध्ये दोन हत्याकांड घडले. या हत्याकांडाने शहरात खळबळ उडाली असून बेरोजगारीतून घडणाऱ्या या घटना रोखण्याचे मोठे आव्हान पोलीस व सरकारसमोर आहे.

पहिली घटना यशोधरानगर पोलीस ठाण्यांतर्गत सोमवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. रियाजुद्दीन जलालुद्दीन अंसारी (२७), रा. शाहनवाज लेआऊट वांजरा असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मोहम्मद अजहर अब्दुल जब्बार (२७), मोहम्मद जावेद ऊर्फ लाला अंसारी आणि मोहम्मद मुशीर अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. आरोपी अजहर याचा माजरी रेल्वे फाटकाजवळ पानठेला आहे. रियाजुद्दीनचा व्यवसाय दुसरीकडे चांगला होत नसल्याने त्याने आपला पानठेला माजरी रेल्वे फाटकाजवळ हलवला. तेव्हापासून दोघांमध्ये वाद सुरू होता. सोमवारी रात्री रियाजुद्दीन हा आपल्या पानठेल्यासमोर उभा होता. त्यावेळी अजहरच्या पानठेल्यावर गर्दी होती. रियाज हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने तो दादागिरी करून अजहरला धमकावत होता. सोमवारीही त्याने शेरेबाजी केली. त्यातून दोघांत वाद झाला. या वादाचा वचपा काढण्यासाठी अजहरने आपल्या साथीदारांच्या मदतीने सोमवारी रात्री तो पानठेल्यासमोर उभा असताना चाकूने वार करून त्याचा खून केला. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.

दुसरी घटना मंगळवारी सायंकाळी सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगळवारी बाजार परिसरात घडली. बाजारात दुकान लावण्याच्या वादातून ही घटना घडली. गोलू ऊर्फ अक्षय निरमळे (३०), रा. मस्कासाथ असे मृताचे तर  राजू मोहनलाल वर्मा, गुड्ड वर्मा, रितेश वर्मा आणि निखिल वर्मा सर्व रा. कळमना अशी आरोपींची नावे असल्याची माहिती आहे. मंगळवारी  बाजारात  गोलू हा चहाचा ठेला लावायचा. मंगळवारी त्याने आरोपींच्या दुकानासमोरच चहाचा ठेला लावल्याने दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणातून दोघांमध्ये मारहाण सुरू झाली व आरोपींनी संगनमताने चाकूने भोसकले. ही घटना सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून मंगळवारी बाजारात व्यवसाय करण्याच्या वादातून ही दुसरी घडली आहे. यापूर्वी दुकानदाराकडून बाजार शुल्क वसूल करण्यावरून एकाचा खून करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विनीता शाहू, गजानन शिवलिंग राजमाने यांच्यासह सदर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध सुरू आहे.